मुंबई - शहरात बनावट भारतीय चलनी नोटांचा व्यवहार करणाऱ्या आरोपीला दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबई युनिटने अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी या संदर्भात फैसल इद्रिस शेख या आरोपीला बनावट चलनी नोटासह अटक केली आहे. या आरोपीला अटक नवी मुंबईतील कळंबोली येथून करण्यात आलेली आहे.
स्वतः बनवत होता बनावट नोटा
एटीएस पथकाच्या मुंबई युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीवरून कळंबोली परिसरामध्ये सापळा रचण्यात आला होता. यावेळेस अटक आरोपी हा नंबर प्लेट नसलेल्या मोटर सायकलवरून आला असता त्याच्या संशयास्पद हालचाली वरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, आरोपीकडून 2 हजार रुपये चलनाच्या 15 नोटा, 500 रुपये चलनाच्या 346 नोटा व 200 रुपये चलनाच्या 88 नोटा मिळून आल्या.
मुंबईत 2 लाख 20 हजार किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त, एकास अटक - मुंबई न्यूज
मुंबईत बनावट भारतीय चलनी नोटांचा व्यवहार करणाऱ्या आरोपीला दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबई युनिटने अटक केली आहे.
![मुंबईत 2 लाख 20 हजार किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त, एकास अटक Man arrested with fake Currency in Mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9504002-377-9504002-1605019478055.jpg)
अटक आरोपींची चौकशी केली असता या सर्व बनावट नोटा असल्याचे त्याने कबूल केले. हा आरोपी मीरा रोड परिसरातील राहणार असून तो स्वतः बनावट नोटा बनवत असल्याचीही कबुली त्याने दिली. पोलिसांनी आरोपीकडून नोटा तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले.
इतर राज्यातील टोळींशी आहे संबंध
अटक करण्यात आलेला आरोपी फैसल इद्रिस शेख याला 2018 मध्ये अशाच एका प्रकरणामध्ये अटक झालेली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. अटक आरोपी हा त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने लाखो रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा व्यवहारात आणण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून करत असल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आलेले आहे. या आरोपीचे पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान येथे बनावट नोटांचा व्यवहार करणाऱ्या टोळींशी संबंध समोर आलेले आहेत.