मुंबई - मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय असे सांगून फसवणूक करणाऱ्या एका गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. हा गुन्हेगार व्यापारी व्यवसायिक यांना फोन करून आपण मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून वस्तू घ्यायचा, आणि पैसे मुख्यमंत्री कार्यालयातून ऑनलाइन पेमेंट होईल असे सांगायचा. मात्र, प्रत्यक्षात असे काही नव्हते, अशाच एका व्यापार्याची फसवणूक झाल्याबद्दलची तक्रार मिळताच पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. भालिंदर सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि इतर परिसरातल्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भालिंदर सिंह या मास्टर माईंड गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी भालिंदर हा व्यापाऱ्यांना फोन करून मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून लॅपटॉप आणि मोबाइल खरेदी करत होता. मात्र, पैशांची देवाण-घेवाण न करता ते सीएम ऑफिसकडून इंटरनेट बँकिंगद्वारे पाठवले गेले आहेत, असे बनावट मेसेज तयार करून व्यापाऱ्यांना पाठवत होता. मात्र, प्रत्यक्षात असे कोणतेही पैसे व्यापाऱ्यांना मिळत नव्हते.