मुंबई- आम्हाला राज्यात आणि देशातही चांगल्या जागा निश्चितच मिळतील. यासाठीचे चित्र 23 मे रोजी पाहायला मिळेल. अनेक ठिकाणी मतदान रात्री आठ वाजेपर्यंत चालू होते. परंतु, त्यापूर्वी सहा वाजता अनेक वृत्तसंस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर करून आकडाही जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या या निष्कर्षावर आम्हाला बिलकुल विश्वास नाही. त्यापेक्षा मतदान सुरू झाल्यापासून संपेपर्यंत बूथवर थांबलेल्या आमच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांसह, आमदार, पदाधिकारी यांनी दिलेल्या अहवालावर आमचा विश्वास असल्याचे काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
माध्यामांशी बोलताना मल्लिकार्जुन खरगे राज्य विधानसभेच्या गटनेता निवडीसाठी काल (सोमवारी) काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत गटनेता निवडीचे सर्वाधिकार राहुल गांधी यांना बहाल करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर खरगे यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
ते म्हणाले, एनडीएने सगळ्याच स्तरावर जोरदार प्रचार केला होता. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचे अनेक नवीन प्रकार भारतालाच नाही तर जगाला दिले. माध्यमाचे आपल्याकडे लक्ष वेधले जाईल यासाठी त्यांनी केदारनाथ येथे ध्यान आणि त्यासाठीचे फोटोसेशन केले आणि त्या माध्यमातून दाखवले गेले. त्यातूनही निवडणुकीच्या २४ तासापूर्वीही भाजपने पद्धतशीरपणे आपला प्रचार केला. पंतप्रधानपदाला एक मोठी मान्यता असते. या पदाला जग सन्मान देते. परंतु, भारतात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पदाची गरिमा घालविण्यासाठी रोज एक नवा प्रकार निवडणूक प्रचारसाठी केला. कोणत्या ना कोणत्या बहाण्याने ते माध्यमात प्रचार करतच राहिले, असे आरोप खरगे यांनी केला.
मोदी आणि शहांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण पाच वर्षात काय केले, हे सांगण्याची संधी मोदी यांना होती. पण, तेही सांगू शकले नाही हेच त्यांचे अपयश होते, अशी टीका खरगे यांनी मोदींवर केली.