मुंबई- राज्यातील कोरोनाच्या रुग्णांनी दोन लाखांचा आकडा पार केला आहे. या आकडेवारीचा विचार करता, राज्यातील एकूण रूग्णसंख्येपैकी 62 टक्के रूग्ण हे पुरुष असून 38 टक्के महिला रूग्ण आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) आकडेवारीनुसार 7 जुलैपर्यंत राज्यात 2 लाख 11 हजार 145 रूग्ण कोरोनाबाधित झाले असून यातील 1 लाख 30 हजार 104 रूग्ण हे पुरुष आहेत. तर 81 हजार 41 महिला रूग्ण आहेत. तर, मृतांमध्ये 65 टक्के पुरुष असून 35 टक्के महिलांचा समावेश आहे. या माहितीवरून पुरुष कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
टक्केवारीनुसार रुग्णसंख्या...
लहान मुलांचे लसीकरण झाल्याने, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने त्यांना संसर्ग कमी होत असल्याचे सुरुवातीपासून म्हटले जात आहे. पण गेल्या पंधरा दिवसांत लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण थोडे फार वाढले आहे. 7 जुलैपर्यंत एकूण रुग्णसंख्येच्या 3.66 टक्के (7727)रूग्ण हे 0 ते 10 वर्षे वयोगटातील आहेत. तर 10 ते 20 वयोगटातील 6.63 टक्के अर्थात 13990 रूग्ण आहेत. त्याचवेळी 100 वर्षाहुन अधिक वयोगटातील एकच रूग्ण कोरोना बाधित आढळला आहे. तर 91 ते 100 वयोगटातील 286 जणांना कोरोनाची लागण झाली असून हे प्रमाण 0.14 टक्के इतके आहे. 81 ते 90 वयोगटातील 1.21 टक्के म्हणजेच 2548 रूग्ण आहेत. 4.46 टक्के, 9407 रूग्ण हे 71 ते 80 वयोगटातील आहेत. 61 ते 70 वयोगटातील रुग्णांची टक्केवारी 10.51 टक्के असून रुग्णसंख्या 22160 इतकी आहे.
दरम्यान, 30 ते 60 वर्षापर्यंतचे नागरिक कोरोनाच्या विळख्यात सर्वाधिक येत असून त्यामध्येही 31 ते 40 वयोगटातील रुग्ण एकूण रूग्णसंख्येच्या सर्वाधिक आहे. एकुण रुग्णसंख्येच्या 20.6 टक्के रूग्ण हे या वयोगटातील असून त्यांचा एकूण आकडा 42314 इतका आहे. त्यापाठोपाठ 21 ते 30 आणि 41 ते 50 वयोगटातील रूग्ण अधिक असून या दोन्ही वयोगटाची टक्केवारी 18.07 टक्के इतकी आहे. 21 ते 30 वयोगटातील 38115 तर 41 ते 50 वयोगटातील 38111 रूग्ण आहेत. 51 ते 60 वयोगटातील 36267 रूग्ण असून त्यांची टक्केवारी 17.19 टक्के इतकी आहे.