मुंबई - विमानात एक प्रवासी फोनवर हायजॅकबद्दल बोलत असताना तेथील एका क्रू कर्मचाऱ्याने ते संभाषण ऐकले. त्यानंतर त्याने याची माहिती विमानतळ प्रशासनाला दिली. यानंतर मुंबई पोलिसांनी त्या प्रवाशाला अटक केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
प्रवाशाला पोलिसांनी केली अटक - मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी रात्री ही घटना घडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. मुंबईवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला. दिल्लीला जाणार्या विस्तारा कंपनीच्या विमानातील क्रू कर्मचाऱ्याने एका पुरुष प्रवाशाने त्याच्या फोनवर अपहरणाबद्दल बोलताना ऐकले. क्रू कर्मचाऱ्याने ताबडतोब याची माहिती विमानतळावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तसेच पोलिसांनाही सतर्क करण्यात आले होते.
आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर - मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेला आरोपी हा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे समोर आले आहे. 2021 पासून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्याने असा प्रकारचे कृत्य केले असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यासंदर्भातला अधिकचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.