मुंबई:याविषयी बोलताना ए के सय्यद सांगतात की, बाबा माहीमला आले तेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त करायचे होते. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी त्यांची आई फातिमा हिच्याकडे हट्ट धरला. तेव्हा त्यांच्या आईने सय्यद खाजा खिदर आले इस्लाम या गुरूंना बाबांना ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी बोलावले. तेव्हा सतत ४० दिवस गुरू सय्यद खाजा खिदर इस्लाम खाडीतील याच जागेवर बसायचे. इथे पूर्वी ओबड-धोबड अशा दगडांचा चौथरा होता. तिथे मगदूम अली यांना ज्ञान प्राप्त करण्याची शिकवण दिली. सतत ४० दिवस ही शिकवणी दिली गेली. बाबा मकदूम ज्ञान प्राप्तीसाठी बसायचे तेव्हा समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या डोक्यावरून व्हायचे, असेही सांगितले जात असल्याचे ए के सय्यद म्हणतात.
हज यात्रेचा किस्सा...? मगदूम बाबाचे अनेक चमत्कारिक किस्से लोक सांगतात. आख्यायिकेनुसार, एकदा दोन व्यक्ती बाबांकडे आल्या. त्यातील एक व्यक्ती फार श्रीमंत होती आणि एक फार गरीब होती. दोघांनाही हज यात्रेला जायचे होते आणि दोघांचेही एकाच मुलीवर प्रेम होते. जो हज यात्रा करून अगोदर येईल तो त्या मुलीबरोबर संसार करेल असे या दोघांचेही ठरले होते. श्रीमंत व्यक्तीकडे पैसे असल्याने तो हजला गेला. परंतु, गरीब व्यक्ती जाऊ शकला नाही आणि तो बाबांकडे आला. त्याने बाबांना विनवणी केली. बाबांनी त्याला समुद्रात डुबकी मारायला सांगितली. आश्चर्य म्हणजे त्याने समुद्रात डुबकी मारल्यानंतर तो थेट हज येथे बाहेर पडला. तेथे गेल्यावर तो माहीममधील लोकांना भेटला. त्याचबरोबर त्या श्रीमंत मित्रालाही भेटला. त्यांची भेट झाल्यानंतर पुन्हा बाबा त्याच्या स्वप्नात आले आणि त्यांनी त्याला पुन्हा हज येथे समुद्रात डुबकी मारायला सांगितली. ती डुबकी मारल्यानंतर तो पुन्हा माहीमच्या खाडीतून बाहेर आला. ती श्रीमंत व्यक्तीसुद्धा हज करून माहीमला पुन्हा परत आली तेव्हा यांच्यामध्ये सर्वांत अगोदर कोण आला हे बघितले गेले. तर हा गरीब माणूस हज करून सर्वांत अगोदर परत आल्याचे सिद्ध झाले. अशा पद्धतीने बाबांचे अनेक चमत्कारिक किस्से असल्याचे ए के सय्यद सांगतात.