मुंबई - कोरोना संक्रमण काळामध्ये मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून संचारबंदी करण्यात आलेली आहे. मात्र, टप्प्याटप्प्याने मुंबई अनलॉकच्या दिशेने चालत असताना शहरात मोठे गुन्हे वाढत असल्याचेही समोर आले आहे.
मुंबईतील मोठ्या गुन्ह्यांमध्ये खून, दरोडा, अपहरण, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबईत घडलेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये तब्बल 60 टक्क्यांची घट झाली असली तरी, अत्याचार, विनयभंग, चोरी, वाहन चोरी यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबईत जुलै महिन्यात एकूण 8 हजार 827 गुन्हे घडले होते. तर, हेच प्रमाण ऑगस्टमध्ये घटले असून शहरात एकूण 3 हजार 388 गुन्हे घडले आहेत. ज्यात मोठ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
जुलै महिन्यात मुंबई शहरात महिला व अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, विनयभंग तसेच इतर शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या संदर्भात तब्बल 243 गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये अल्पवयीन मुलींवर 33 प्रकरणात अत्याचार झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून 15 महिलांवर जुलै महिन्यात अत्याचार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. 55 अल्पवयीन मुलींचे अपहरण जुलै महिन्यात घडले असून 1 महिलेचा अपहरणाचा गुन्हा जुलै महिन्यात मुंबई पोलिसांनी दाखल केला आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात हेच प्रमाण वाढले असून महिलांवर झालेल्या अत्याचाराचे 334 गुन्हे दाखल आहेत. ज्यात, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे 32 गुन्हे घडले असून 22 महिलांवर अत्याचाराचे गुन्हे घडलेले आहेत. तर, 76 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे मुंबई पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात दाखल केलेले आहेत. विनयभंगाचे 129 गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत.