महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mahendragiri Frigate Launched: ब्रह्मोसने सज्ज 'महेंद्रगिरी' फ्रिगेट युद्धनौकेचे जलावतरण

महेंद्रगिरी (Mahendragiri Frigate Launched) या प्रोजेक्ट 17A श्रेणीतील शेवटच्या युद्धनौकेचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhad) यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड (Dr Sudesh Dhankhad) यांच्या हस्ते आज माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई (Mazgaon Dock Shipbuilders Ltd Mumbai) येथे जलावतरण करण्यात आले. याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमडीएलचे अध्यक्ष संजीव सिंघल, नौसेना अध्यक्ष आर हरिकुमार तसंच कामगार मंत्री सुरेश खाडे हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नौसेनेच कौतुक केलं आहे.

Mahendragiri Frigate Launched
महेंद्रगिरी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 5:54 PM IST

महेंद्रगिरी युद्धनौकेचे जलावतरण

मुंबईMahendragiri Frigate Launched :याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नौसेनेचं भरभरून कौतुक केलं असून देशासाठी ही फार मोठी गर्वाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. (Mahendragiri Frigate Launched) सर्वांत कमी अवधीत ही युद्धनौका तयार करण्यात आली असून जो समुद्रावर राज्य करतो तो जगावर राज्य करतो असं सांगून समुद्रावर सत्ता आता भारताची आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या युद्धनौकेला महेंद्रगिरी (Mahendragiri Warship) हे नाव ओरिसा राज्यातील पूर्व घाटातील पर्वत शिखरावरून देण्यात आलं आहे. प्रोजेक्ट 17A श्रेणीतील ही सातवी युद्धनौका आहे. या युद्धनौका प्रोजेक्ट 17 श्रेणी (शिवालिक श्रेणी) मधील असून त्यामध्ये सुधारित मारक क्षमतेची वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स तसंच प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित आहे. नव्याने नामकरण केलेली महेंद्रगिरी ही तंत्रज्ञान दृष्ट्या अतिशय प्रगत युद्धनौका असून स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या भविष्याकडे वाटचाल करत आहे. ती समृद्ध नौदल वारसा अंगीकारण्याच्या भारताच्या निर्धाराचे प्रतीक सुद्धा मानली जाते.

अतुलनीय प्रगतीचे उत्तम उदाहरण :प्रोजेक्ट 17A कार्यक्रमांतर्गत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कडून एकूण चार जहाजे आणि जीआरएसई कडून तीन जहाजांची निर्मिती केली जात आहे. २०१९ ते २०२३ दरम्यान टायर केलेल्या या श्रेणीतील सहा युद्धनौकांचा आतापर्यंत नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. युद्धनौका डिझाईन क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने प्रोजेक्ट 17A जहाजांची रचना केली आहे. आत्मनिर्भरतेच्या देशाच्या दृढ वचनबद्धतेला अनुरूप प्रकल्प 17A जहाजांच्या उपकरणे आणि प्रणालींसाठी ७५ टक्के सामग्री स्वदेशी कंपन्यांकडून खरेदी करण्यात आली आहे. ज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांचा समावेश आहे. महेंद्रगिरी युद्धनौकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश होणे म्हणजे भारताने आत्मनिर्भर नौदलाच्या उभारण्यात केलेल्या अतुलनीय प्रगतीचे एक उत्तम उदाहरण असल्याचंही उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितलं.

सर्वांत कमी कालावधीत निर्मिती :माझगाव डॉकच्या कारखान्यात प्रकल्प 17A अंतर्गत तयार होणाऱ्या ‘निलगिरी’ श्रेणीतील चारपैकी ‘महेंद्रगिरी’ ही अखेरची फ्रिगेट युद्धनौका आहे. यापूर्वीच्या तयार करण्यात आलेल्या तीन युद्धनौकांचे अनुक्रमे सप्टेंबर २०१९ मध्ये नंतर मे २०२२ मध्ये व सप्टेंबर २०२३ मध्ये बांधणीनंतर जलावतरण झाले. मात्र या तिन्ही युद्धनौकांचा बांधणीचा कालावधी फार मोठा होता. ‘निलगिरी’ साठी २१ महिन्याचा कालावधी लागला. ‘उदयगिरी’ साठी तीन वर्षाचा तर ‘तारागिरी’चा कालावधी हा दोन वर्षांचा होता. परंतु महेंद्रगिरीचा कालावधी हा फक्त १३ महिन्याचा असून सर्वांत कमी कालावधीमध्ये तयार करण्यात आलेली ही पहिलीच युद्धनौका आहे.


अत्याधुनिक प्रणाली :जलावतरणानंतर नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यापूर्वी या युद्धनौका ब्रम्होस क्षेपणास्त्राने सज्ज होणार आहेत. ४०० किमी लांबीपर्यंत मारा करू शकतील अशी ८ क्षेपणास्त्रे महेंद्रगिरीवर असणार आहेत. आकाश व जमिनीवर उभ्या प्रकारे मारा करू शकणारी व दोन्ही लक्ष टिपू शकणारी त्याचबरोबर समुद्री पृष्ठभागावर मारा करू शकणारी ३२ बराक क्षेपणास्त्र देखील यावर असतील. तसंच अन्य रडार व अत्याधुनिक संवाद प्रणाली तसंच विविध प्रकारच्या तोफांनी ही युद्धनौका सज्ज असेल.

हेही वाचा

  1. नौदलाला मिळाली मोठी ताकद; भारतीय बनावटीच्या INS सुरत व उदयगिरी युद्धनौकांचे जलावतरण, 'या' आहेत विशेषतः
  2. वागीर पाणबुडीचे जलावतरण, चांगल्या कामगिरीची अपेक्षा
  3. राजनाथ सिंह यांच्या हस्ते माझगांव डॉकमध्ये आयएनएस निलगिरीचे जलावतरण

ABOUT THE AUTHOR

...view details