मुंबई Mahayuti vs Mahavikas Aghadi : बुधवारी ठाकरे गटाचे उपनेते तथा मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यामुळं दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली. त्यांनी जे गद्दार होते, ते शिवसेनेतून बाहेर पडले. पण हे गद्दार बाळासाहेबांचं नाव वापरताहेत. आता तर हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी लावताहेत. अरे भोxxx तुला हिंदुहृदयसम्राटचा अर्थ तरी माहित आहे का?, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन दळवींना अटक करण्यात आली आहे. तर मविआ सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळं नारायण राणे यांनाही अटक करण्यात आली होती. या दोन्ही घटना दोन वेगवेगळ्या सरकारच्या काळात घडल्या आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीनं जे केलं, त्याचा बदला महायुतीनं घेतला असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महायुतीनं घेतला बदल? : बुधवारी पोलिसांनी दत्ता दळवींना अटक केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात नारायण राणेंना मविआ सरकारनं अटक केली होती. त्याचा बदला आता महायुतीनं घेतल्याची चर्चा सगळीकडं सुरू आहे. यावर राज्यात सूडाचं राजकारण सुरु असल्याचं राजकीय क्षेत्रातील जाणकारांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मविआ सरकारनं अटक केल्याचा राग भाजपा नेत्यांना होता. नारायण राणेंना अटक केली, तेव्हा त्यांना नीटपणे जेवण सुद्धा करु दिलं नव्हतं. जेवणाच्या ताटावरुन उचलून नारायण राणेंना नेलं होतं. ज्याप्रकारे नारायणे राणेंना अटक करण्यात आली होती, त्याचा राग भाजपा नेत्यांनी बोलून दाखवला होता. "करारा जवाब मिलेगा "असं त्यावेळी राणेंच्या दोन्ही मुलांनी म्हटलं होतं. बुधवारी महायुतीनं दळवींना अटक केल्यानंतर राणेंच्या अटकेचा बदला महायुतीनं घेतल्याच्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
सूडाचं राजकारण नाही : दत्ता दळवींना काल अटक केल्यानंतर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही कोणाचाही बदल घेतला नाही, किंवा सूडाचं राजकारण केले नाही. उलट आम्ही विकासाचे, लोकांच्या हिताचं काम करण्यासाठी कटीबद्ध असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडं सध्या राज्यात ताणाशाही, हुकूमशाही सुरु असून, सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना नामोहरम करण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.