मुंबई : मुंबईतील 'ग्रँड हयात' हॉटेल येथे मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात उभ्या राहिलेल्या 'इंडिया' आघाडीची महत्त्वाची बैठक 31 ऑगस्ट आणि एक सप्टेंबर या तारखेला होत आहे. बैठकीची तयारी एकीकडे सुरू असतानाच, आता राज्यातील सत्ताधारी 'महायुती'नंसुद्धा 31 ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला मुंबईतील वरळी येथे बैठक आयोजित केल्याची माहिती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. (Sunil Tatkare on Mahayuti Meeting in Mumbai) (Mahayuti Meeting in Mumbai) (Mahayuti Meeting Mumbai Date) (INDIA Meeting Mumbai)
मतदारसंघांचा घेणार आढावा : ही बैठक 'इंडिया' आघाडीला शह देण्यासाठी नाही तर ही बैठक पूर्वनियोजित आहे. गेल्या एक महिन्यापासून याबाबत नियोजन सुरू आहे. मात्र, सर्व नेत्यांच्या सोयीची वेळ म्हणून 31 ऑगस्ट आणि एक तारीख निवडल्याचं तटकरे यांनी सांगितलं. या बैठकीमध्ये राज्यातील लोकसभेच्या 48 मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीमध्ये कुठल्याही पद्धतीनं जागा वाटपाबाबत चर्चा होणार नाही, केवळ आढावा बैठक आहे. या बैठकीला महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर मंत्री तसेच अन्य महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील, असंही तटकरे यांनी यावेळी सांगितलं.
कोल्हापूरमध्ये घेणार सभा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बीड येथील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर आता येत्या 10 सप्टेंबर रोजी कोल्हापूरमधील तपोवन मैदानात सभा घेण्यात येणार आहे. शरद पवार ज्या ठिकाणी सभा घेतात त्याच ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत का? यावर तटकरे म्हणाले की, राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी सभा घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. केवळ कोल्हापूरच नाही तर अन्य ठिकाणीही आम्ही सभा घेणार आहोत. लवकरच राज्यव्यापी दौऱ्याचं नियोजन केलं जाणार आहे.
भुजबळांच्या वक्तव्यावर मौन : मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर सभेत टीका केली. या टीकेबद्दल सुनील तटकरे यांनी बोलण्यास नकार दिला. यासंदर्भात आपण मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त करू, असं ते म्हणाले.