महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज पत्रकार परिषद, जागा वाटपाचा तिढा सुटणार?

Mahayauti PC : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती कशा प्रकारे एकत्र काम करणार आहे, याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज महायुतीची महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलंय.

महायुती
महायुती

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 7:39 AM IST

मुंबई Mahayauti PC : मराठा आरक्षण उपसमितीची बैठक मंगळवारी झाली आहे. या समितीच्या बैठकीला आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. आगामी निवडणुका संदर्भात महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलीय. ते मुंबईत मंगळवारी माध्यमांशी बोलत होते.


महायुतीची आज महत्त्वाची पत्रकार परिषद : महायुतीमध्ये निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, जोपर्यंत जागावाटप जाहीर होत नाही, तोपर्यंत प्रत्येक पक्ष आपापल्या संघटनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं भारतीय जनता पक्षाकडून प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हेसुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं 'शिवसंपर्क अभियान' राबवत आहेत. याच आठवड्यात या अभियानाला सुरुवात होत आहे. आम्हीसुद्धा राज्यभरात आमचा पक्ष आणि संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारीचाच हा एक भाग आहे.

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री, हे सरकार खूप सकारात्मक आहे. 80 ते 85 टक्के कायदेशीर काम पूर्ण झालंय. सरकार एक एक पाऊल पुढं टाकतंय. जरांगे यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, एवढीच सरकारच्यावतीनं त्यांना विनंती आहे. दरम्यान येत्या 24 जानेवारीला होणाऱ्या क्युरेटीव्ह पिटीशनमध्ये आणखी काय बाजू मांडता येईल, याबाबतही त्यांनी सुचवावे, अशी विनंती जरांगे यांना करण्यात आली- मंत्री शंभूराज देसाई

काय म्हणाले शंभूराज देसाई : मराठा आरक्षण उपसमितीची दर आठवड्याला बैठक होत असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मराठा आरक्षण उपसमितीच्या कामासंदर्भातली बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चार वाजता आयोजित केली होती. या बैठकीला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील ऑनलाईन उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिंदे समितीला त्यांचे अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आणखी व्याप्ती वाढवायची असेल तर आयोगाच्या अध्यक्षांना आम्ही विनंती करू शकतो. शिंदे समितीचं काम कुठंही थांबलेलं नाही, त्याचं काम सुरू आहे. ठरलेल्या मुदतीत त्यांचा अहवालदेखील प्राप्त होईल, अशी परिस्थिती असल्याचं मंत्री देसाई यांनी म्हटले.

तिन्ही पक्ष एकत्र येऊन आगामी निवडणुका कशा लढवल्या जातील, त्याची रणनीती काय असेल याबाबत चर्चा करणार आहोत. या अनुषंगाने कशा पद्धतीनं एकत्र काम केलं जाणार आहे, त्याचा आराखडा आणि नियोजन काय असेल यासंदर्भात महायुतीची पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे-शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई

हेही वाचा :

  1. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व्हेक्षणाचं काम बिनचूक व्हावं; मुख्यमंत्री शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
  2. "ठाण्याचा विकास मोदींमुळं रखडला", 'ईटीव्ही भारत'च्या निवडणूक चर्चासत्रात विरोधकांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details