सिद्धार्थ मोकळे यांची प्रतिक्रिया मुंबई :वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीमध्ये समावेश करण्यासाठी वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर सातत्यानं प्रयत्न करीत आहेत. इंडिया आघाडीमध्ये वंचितचा समावेश करण्याबाबत सकारात्मक असल्याची भाषा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात इंडिया आघाडीत समावेशाबाबत वंचित बहुजन आघाडीला कोणतंही अधिकृत निमंत्रण मिळालेलं नाही.
समान जागा वाटप करा :या संदर्भात बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, यापूर्वीच आम्ही महाविकास आघाडीला पर्याय सुचवला आहे. वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रातील ताकद, मतदारसंघांमध्ये असलेला संपर्क पाहता चारही पक्षांमध्ये बारा-बारा अशा समान जागा वाटप करण्यात याव्यात. त्यासाठी महाविकास आघाडीनं वंचित बरोबर बैठक घेऊन अंतिम निर्णय घ्यावा. यासाठी आम्ही वारंवार सुचविलं आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात महाविकास आघाडीकडून ठोस पावलं उचलली नाहीत, असं आंबेडकर यांनी सांगितलं.
वंचितच्या समावेशाबाबत चर्चा सुरू :वंचितचा महाविकास आघाडी तसंच इंडिया आघाडीतील समावेशाबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत या संदर्भात चर्चा झाली आहे. तसंच महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांसोबतही चर्चा सुरू असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितलं.
आधी तुमचं ठरवून घ्या :नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितच्या समावेशाबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र प्रत्यक्षात आमच्यापर्यंत काहीही माहिती आलेली नाही, असं वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निमंत्रणावरून वंचितचे प्रतिनिधी बैठकीसाठी गेले होते. या बैठकीनंतर संबंधित नेत्यांशी चर्चा केली. तेव्हा राज्यात महाविकास आघाडीमध्येच जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) पक्षात चर्चा झालेली नाही. त्यामुळं वंचितचा समावेश करण्यापूर्वी या तिन्ही पक्षांनी आपापसात जागा वाटपाबाबत ठरवून घ्यावं, मगच आमच्याशी चर्चा करावी, असं मोकळे यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- आता ८० वर्षाच्या व्यक्तींनी मार्गदर्शन करावे, अजित पवारांचा शरद पवारांना टोला
- बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे कोणामुळं निवडून आल्या? अजित पवारांनी उडविली खिल्ली
- आमच्या दोन जागा मुख्यमंत्र्यांकडं, पण पक्षानं जबाबदारी दिली तर लोकसभा लढवेन-हसन मुश्रीफ