महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविकास आघाडीचे सरकार फसवे नाही, जे बोलते ते करते- नवाब मलिक

फडणवीस यांनी 90 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि 36 हजार कोटींच्या रकमेची घोषणा केली होती. परंतु, प्रत्यक्षात काय झाले? पाच वर्षात त्यानी केवळ कर्जमाफीची घोषणा केली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काय मिळाले, असा सवाल करत मलिक यांनी फडणवीस यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले.

mumbai
नवाब मलिक

By

Published : Dec 25, 2019, 4:58 AM IST

मुंबई- राज्यात स्थापन झालेले शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार फसवे नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व आमदार नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. फडणवीस यांनी नुकतेच सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पूसनारी आहे, अशी टीका केली होती. त्यावर मलिक यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती. आता त्या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे प्रत्येकी दोन लाखांचे कर्ज माफ होणार म्हणजे होणार. त्यात कुठलीही दिरंगाई केली जाणार नाही. शेतकऱ्यांनाही अत्यंत सोप्या पद्धतीने कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस यांना ही गोष्ट कळली पाहिजे असे मलिक म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारातबाबत मलिक यांना विचारले असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना विशेषाधिकार असतात. ते त्यांचा अधिकार लवकरच बजावतील. त्यात काँग्रेसकडून थोडीशी दिरंगाई होत आहे. परंतु, काँग्रेसची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्यांचे निरीक्षक, अध्यक्ष यांची सर्व मते आणि निर्णय घेऊन ते जाहीर करतात. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल, अशी घोषणा झाली होती. त्यामुळे आम्हाला वाटते की या वर्षाच्या अखेरीस मंत्रिमंडळ विस्तार झालेला दिसेल, असे नवाब मलिक म्हणाले.

त्याचबरोबर, महिनाभरापूर्वी स्थापन झालेल्या आमच्या सरकारने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक कर्जमाफीची घोषणा केली. आणि आता त्याची लवकरच कार्यवाही सुरू होईल. त्यासाठी फडणवीस सरकारसारखे ऑनलाईन करण्याची भानगड नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. फडणवीस यांनी 90 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि 36 हजार कोटींच्या रकमेची घोषणा केली होती. परंतु, प्रत्यक्षात काय झाले? पाच वर्षात त्यानी केवळ कर्जमाफीची घोषणा केली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काय मिळाले, असा सवाल करत मलिक यांनी फडणवीस यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले. फडणवीस यांच्या कर्जमाफीचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा मिळाला नाही. शेतकऱ्यांची केवळ फसवेगिरी करायचे काम त्यांच्या सरकारने आपल्या काळात केले हे देवेंद्रजी यांना कळले पाहिजे, असेही मलिक म्हणाले.

हेही वाचा-एनएसयुआयने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना घातला घेराव; राहुल गांधींची बदनामी केल्याचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details