महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील दिवसभरातील कोरोनाच्या ताज्या घडामोडी; जाणून घ्या एका क्लिकवर

कोरोना अपडेट
corona update

By

Published : May 26, 2021, 7:05 AM IST

Updated : May 26, 2021, 10:45 PM IST

21:58 May 26

राज्यात 24 हजार 752 नव्या रुग्णांची नोंद..

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आज राज्यात 24 हजार 752नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 56 लाख, 50 हजार 907 इतकी झाली आहे. असं असलं, तरी आज राज्यात 23 हजार 065 इतक्या रुग्णांनी कोरोना वर मातही केली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 52 लाख, 41 हजार 833 इतकी झाली आहे. एका बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुळे मृत होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात 24 तासांत 453 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

20:50 May 26

नांदेड जिल्ह्यात 212 व्यक्ती कोरोना बाधित 5 जणाचा मृत्यू...225 कोरोना बाधित झाले बरे...!

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 115 अहवालापैकी  212 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 97 तर अँटिजेन तपासणीद्वारे 115 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 88 हजार 626 एवढी झाली असून यातील 84 हजार 724 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 585 रुग्ण उपचार घेत असून 61 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

19:13 May 26

मुंबई लसीकरण खरेदी केंद्राच्या धोरणामुळे अडकणार

मुंबई -केंद्राच्या लसीकरणाच्या चुकीच्या धोरणामुळे मुंबईचे लसीकरण अडकण्याची शक्यता मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून लस खरेदी करण्याबाबत ग्लोबल टेंडर काढण्यात आले होते. या टेंडरला सात ते आठ कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र केंद्र सरकार कडून लसींची खरेदीबाबत असलेल्या नियमांमुळे मुंबई महानगरपालिका लस खरेदी करू शकणार नसल्याने मुंबईच्या लसीकरणाची गती कमी होण्याची शक्यता असलम शेख यांनी वर्तवली आहे. लसीकरणाबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर धोरण तयार केले पाहिजे. त्यामुळे राज्यात लसीकरणाला वेळ देता येईल असेही यावेळी अस्लम शेख यांनी सांगितले.

19:12 May 26

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाखांवर, 1362 नवे रुग्ण, 34 रुग्णांचा मृत्यू

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. गेले दोन दिवस एक हजार रुग्ण आढळून आले होते. त्यात आज वाढ झाली आहे. आज 1362 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1021 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

19:12 May 26

भूमी पेडणेकर चे ‘कोविड वॉरियर’ आणि श्री श्री रविशंकर यांचे ‘मिशन जिंदगी’ एकत्रितपणे कोविडग्रस्तांच्या मदतीला!

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा खूपच भयानक आहे ज्यात मनोरंजनसृष्टीतीलसुद्धा अनेकांना लपेट्यात घेतले. अनेक आघाडीच्या कलाकारांना कोरोनाची लागण झाली ज्यात अभिनेत्री भूमी पेडणेकरचाही नंबर येतो. बॉलिवूडकर लोकांना सुरक्षित राहण्यासाठी पदोपदी आवाहन करतच आहेत परंतु ज्यांना कोरोना होऊन गेलाय ते कलाकार तळमळीने सांगताहेत की कोरोनाविरुद्ध लढण्याची त्रिसूत्री, हात वारंवार धुणे, मास्क चा यथोचित वापर करणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे, न चुकता पाळा. भूमी तर त्याहीपुढे जाऊन कोरोनाग्रस्तांना मदत करताना दिसतेय. या साथीच्या आजारात जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घेऊन ती काम करतेय.

19:11 May 26

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मोहा येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राची सुरुवात‌

परळी‌ वैजनाथ - संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मोहा शिवारामध्ये सुद्धा दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशान्वये ग्रामपंचायत कार्यालय मोहा व प्राथमिक आरोग्य केंद्र मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.कें.प्रा.शाळा मोहा येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली. अशा प्रकारचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करणारी जिल्ह्यातील मोहा ग्रामपंचायत हे एकमेव असल्या कारणाने या ठिकाणच्या सरपंच सौ रुक्मिणीबाई पांडुरंग शेप व पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाने अभिनंदन केले आहे.

19:07 May 26

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना मदतीचा हात; जिल्हा प्रशासनाची हेल्पलाईन

ठाणे : कोरोनाने अनेकांचे जीवन उधवस्त केलंय. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात अनेक मुलं ही अनाथ झालीत. आई-वडील दोघांचेही निधन झाले. घरात बाळाला, बालकांना पहायला कुणीच नाही. नातेवाईकांनीही साथ सोडली. अशावेळी ठाणे जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात पुढे करत, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना मायेचा आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा कठीण प्रसंगी त्यासाठी सेव्ह द चिल्ड्रन यांच्या संयुक्त विद्यमाने कक्ष तयार केला असून 830899222, 7400015518 हेल्पलाईन सुरू केली आहे.

19:07 May 26

गंगापूर शहरात वार्ड निहाय लसीकरण करा :आरोग्य व स्वच्छता सभापती पल्लवी शिरसाट

गंगापूर शहरातील नागरिकांना covid-19 चे वार्ड निहाय लसीकरण करा अशा सूचना सभापती आरोग्य व स्वच्छता समिती नगरपरिषद पल्लवी शिरसाट यांनी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रमेश पवार यांच्याकडे केली आहे. गंगापूर शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी covid-19 चे लसीकरण अजून पूर्ण केले नसून अनेक नागरिक हे लसीकरणापासून वंचित आहे शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण सुरू असून या उपजिल्हा रुग्णालयात शहरातील अनेक नागरिक आल्यानंतर त्या ठिकाणी गर्दी होते.

18:14 May 26

धक्कादायक अमरावतीच्या परतवाड्यात खाजगी कोविड रुग्णालयात कागदावर दिलं जाते बिल....

अमरावती : राज्यात कोरोना महामारीने लोक त्रस्त आहे. अनेक ठिकाणी बेड-ऑक्सिजन सुद्धा उपलब्ध नाही. रुग्णांकडून अव्वाच्यासवा पैसे घेऊन कोरोना बधितांवर उपचार केल्या जात असल्याच्या घटना या राज्यात सातत्याने घडत असतानाच, आता अमरावतीच्या परतवाडा मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील भामकर कोविड रुग्णालय मध्ये रुग्णाकडून अधिक पैसे घेवून त्यांना पक्के बिल न देता, कच्चे बिल देण्यात येत आहे व रुग्णांकडून अधिकची लूट होत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

18:13 May 26

चंद्रपूर : गत 24 तासात 674 कोरोनामुक्त, 278 पॉझिटिव्ह तर 09 मृत्यू

चंद्रपूर :जिल्ह्यात मागील 24 तासात 674 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 278 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून, 9 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 81 हजार 790 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 76 हजार 157 झाली आहे. सध्या 4 हजार 222 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 62 हजार 220 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 77 हजार 508 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

17:19 May 26

तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी शासकीय आणि खाजगी हॉस्पिटल्सनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी

कोल्हापूर : तिसरी लाट येईल का ? आणि आली तर जिल्ह्यातील लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल या विषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध असले पाहिजे. त्या दृष्टीने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी हॉस्पिटल्सनी सज्ज रहावे, त्याचबरोबर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल्सनी फॅसिलिटी ॲप दैनंदिन मेंन्टेन (अद्ययावत) करावा. याबाबत हलगर्जीपण करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात बालरोग तज्ज्ञांसोबत व्हिडिओकॉन्फरन्सिंगव्दारे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

16:21 May 26

दोन शाळकरी मुलांचा पुढाकार, म्युकरमायकोसिस विरोधात लढण्यास जमा करत आहेत फंड

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकर मायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या आजारावर उपचार घेत असतना सामान्य नागरिकांची अर्थिक बाजू पर्णपणे खालावत आहे. खासगी रुग्णालयाची बिलं लाखोंच्या घरात आहेत. अशा काळा मुंबईच्या Cathedral and John Connon शाळेची दोन मुलं पुढे सरसावली आहेत. या दोन्ही मुलांनी समोर येवून. म्युकर मायकोसिस आजाराच्या उपचारासाठी फंड गोळा करण्याचं काम सुरु केलं आहे.या दोन्ही मुलांची नावं अर्नव गुप्ता आणि रनई लोनकर अशी आहेत. 

16:21 May 26

प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्ट कोविड विभाग आवश्यक-पृथ्वीराज चव्हाण

कराड- कोरोनानंतर बरे झालेल्यांची नोंदणी करून त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्ट कोविड विभागाची व्यवस्था उपलब्ध करावी, अशी सूचना माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठकीत केली. 

16:01 May 26

कोरोना टेस्टच्या नावाने प्रवाशांना लुबाडणारा बोगस टीसी गजाआड..

ठाणे :कोरोना टेस्टच्या अहवालाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस टीसीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आशिष बाळकृष्ण सोनवणे असे या भामट्याचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडील काटेनवली परिसरात राहणार आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असलेला भामटा आशिष याच्या विरोधात यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

15:36 May 26

नागपूर महानगरपालिकेकडून महिनाभरात ६५ हजार 'सुपर स्प्रेडर्स'ची कोरोना चाचणी

नागपूर : कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बाजारपेठा, बँक, आटो चालक, डिलीव्हरी बाय, पेपर हाकर्स, शासकीय आणि खाजगी कार्यालय, दुकाने इत्यादी ठिकाणी 'सुपर स्प्रेडर'ची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मनपाच्या दहाही झोनमध्ये सुपर स्प्रेडर'ची कोरोना चाचणी करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.

15:34 May 26

विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बांधवांची डॉ. योगेश भालेराव यांनी केली आरोग्य तपासणी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य हे संकटात आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन लावला आहे व यात नियमांची कडक अंमलबजावणी देखील केली आहे. लवकरात लवकर कोरोना मुक्त राज्य कसे होहिल यावर आरोग्य यंत्रणा देखील काम करत आहे. हे सर्व असताना आता मुंबईमधील विक्रोळी विभागत रहाणारे समाजसेवक डॉ. योगेश भालेराव यांनी आज २६ मे रोजी सकळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बांधवांसाठी प्राथमिक आरोग्य शिबिर भरवले.

15:32 May 26

जिल्ह्यात सध्या 1,418 बेड, 271 ऑक्सिजन बेड; तर 78 व्हेंटिलेटर बेड (ICU) उपलब्ध

रत्नागिरी :राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर १८ जिल्ह्यांतील गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे जाहीर केला आहे. गृह विलगीकरण ऐवजी या जिल्ह्यात कोरोना केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे. गृह विलगीकरण असणाऱ्या रूग्णांमुळे संसर्ग वाढत असून ते रोखण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचा देखील या 18 जिल्ह्यांमध्ये समावेश आहे.

जिल्ह्यात कालपर्यंत 1 हजार 456 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सध्या होम आयसोलेशन असणााऱ्यांवर ग्रामकृती दल लक्ष ठेवून असणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान सद्यस्थितीत आयसोलेशन बेड (नॉन ऑक्सिजन बेड) 1,418 एवढे उपलब्ध आहेत. तर ऑक्सिजन बेड 271 उपलब्ध आहेत, तर व्हेंटिलेटर बेड (ICU) 78 उपलब्ध आहेत.

14:47 May 26

पुण्यात उघडली ऑक्सिजन लायब्ररी! पोस्टकोविड रुग्णांसाठी ठरणार फायदेशीर

कोरोनातुन बरे होऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होत आहे. अशावेळी या रुग्णांना पुन्हा ऑक्सिजन देण्याची गरज भासत आहे. या एका कारणासाठी संबंधित रुग्णाला पुन्हा रूग्णालयात ऍडमिट करावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' लायब्ररी हा उपक्रम सुरू केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे रुग्णाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरच्या घरी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यासाठी देण्यात येणार आहे. शहरातील गरजू रुग्णांना वापरण्यास देण्यासाठी या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररीची स्थापना करण्यात आली आहे.

14:47 May 26

लसीकरणात चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा ना. ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते सत्कार

नंदुरबार - राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते गावात 45 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरण करणाऱ्या नंदुरबार तालुक्यातील सिंदगव्हाण, नवापुर तालुक्यातील सागाळी आणि शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर या तीन ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा अधिकारी उपस्थित होते.

14:46 May 26

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा, मग उपचार करायचे कसे

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरसह संपूर्ण विदर्भात म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस या आजाराची लागण झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र या आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे तर औषधे आणि इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार करायचा कसा, हा मोठा प्रश्न उपचार करणाऱ्या डॉक्टरां समोर निर्माण झाला आहे. 

14:45 May 26

1 जून नंतर लॉकडाऊनच्या नियमात अंशतः शिथिलता दिली जाण्याची शक्यता!

मुंबई-राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य सरकार कडून लॉक डाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉक डाऊन 1 जूनला सकाळी संपणार आहे. मात्र लॉक डाऊन वाढवण्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. तरी लॉक डाऊनच्या नियमात काही शिथिलता आणण्याची शक्यता सरकारमधील काही मंत्र्यांकडून वर्तवण्यात आली आहे.

14:45 May 26

मुंबईकरांना लोकल प्रवासाची करावी लागेल आणखी प्रतीक्षा

मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा 1 जून 2021 पर्यत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली. मात्र, आता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून लोकलमध्ये प्रवेश देण्याची मागणी जोरधरत आहे.  मात्र, राज्य सरकारने  लोकलची गर्दी लक्षात घेता आणखी पुढील पंधरा दिवस सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलचे दार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

14:44 May 26

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विविध ठिकाणी लसीकरण केंद्राचे महानगरपालिकेकडून उद्घाटन केले जात आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विविध ठिकाणी लसीकरण केंद्राचे महानगरपालिकेकडून उद्घाटन केले जात आहे. त्याच प्रमाणे बोरिवली प्रबोधनकार ठाकरे सभागृह मध्ये लसीकरण केंद्रचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र हा प्रभाग भाजपचा असल्यामुळे या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती त्यामुळे सोशल डिस्टंसिंग फज्जा देखील या ठिकाणी उडालेला पाहायला मिळाला.

11:44 May 26

लखनऊपाठोपाठ मुंबईच्या सांडपाण्यातही आढळला कोरोना विषाणू

लखनऊपाठोपाठ मुंबईच्या सांडपण्यातही आढळला कोरोना विषाणू

लखनऊ/ मुंबई - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आता पाण्यातही कोरोना विषाणू आढळून आले आहेत. याव्यतरिक्त मुंबईतील सांडपाण्यातही कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील इतर राज्यातही याबाबतची तपासणी सुरू आहे. कोरोनाची लागण झालेले सर्व रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा मल गटारात पडतो. विविध देशांमधील अभ्यासात असे आढळले आहे, की 50 टक्के रुग्णांच्या मलमध्येही कोरोना विषाणू असतो. आणि त्यांच्या माध्यमातूनच हा विषाणू सांडपाण्यात पोहचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

07:05 May 26

नागपुरात कोरोना रुग्णसंख्येत घट; रुग्णालयात बेड रिक्त

नागपुरात कोरोना रुग्णसंख्येत घट

नागपूर- जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली दिसून येत आहे. हजारोंच्या संख्येने निघणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता दिवसाकाठी ५००च्या आत आले आहे. फेब्रुवारीनंतर कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली होती. त्यावेळी कोरोना रुग्णांचा आकडा ७९ हजारांच्या घरात पोहचला होता. मात्र, आता ही रुग्णसंख्या १२ हजार ३८५ वर पोहोचली आहे. वाढीव रुग्णसंख्येमुळे एकेकाळी गंभीर रुग्णानांही बेड मिळत नसल्याची परिस्थिती ओढवली होती. मात्र, आता रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे रुग्णालयात अनेक बेड रिकामे असल्याचे चित्र दिसत आहे. 

06:49 May 26

मुंबईने लसीकरणाचा 30 लाखांचा टप्पा ओलांडला, मंगळवारी 34 हजार 265 लाभार्थ्यांना लस

मुंबईने लसीकरणाचा 30 लाखांचा टप्पा ओलांडला

मुंबई- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आज मंगळवारी 34 हजार 265 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 30 लाख 14 हजार 743 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मुंबईत गेल्या चार महिन्यात 30 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Last Updated : May 26, 2021, 10:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details