नवी दिल्ली - राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी दिल्लीतील नेत्यांचे मार्गदर्शन घेतल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
मंत्रीमंडळ विस्तारात काँग्रेसच्या १२ आमदारांना मंत्रीपदे मिळाली. आम्ही सर्वजण राहुल गांधी आणि सोनिया गांधींना भेटलो. राहुल गांधीचे मार्गदर्शन घेतले तसेच सोनिया गांधींचे आशीर्वाद घेतले. किमान समान कार्यक्रमांतर्गत पुढे कसे काम करायचे याबाबत चर्चा झाल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
मंत्रीमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमधील काही आमदार नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावर थोरात म्हणाले, मंत्रीपदासाठी फक्त काही ठराविक सदस्यांना निवडावे लागते. त्यामुळे थोडी अडचण आली, मात्र, नाराज आमदारांशीही चर्चा चालू आहे, सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.
काँग्रेसचे सर्व मंत्री राहुल गांधी आणि सोनियाजींचे आभार मानण्यासाठी दिल्लीमध्ये आले होते. यापुढील मार्ग कसा असेल, यावर चर्चा झाली. काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेची काळजी घेईल आणि जनतेच्या कामांकडे लक्ष देण्यासाठी सोनिया गांधींनी सांगितल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.
'किमान समान कार्यक्रमांतर्गत कसं काम करायचे याविषयी चर्चा करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो होतो. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे सल्ला आणि मार्गदर्शन घेतले. मंत्रीमंडळ विस्तारानंतर कोणतीही नाराजी नाही. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे मंत्र्यांची संख्या कमी आहे, असे काँग्रेस मंत्री के. सी पाडावी यांनी सांगितले.
शिवसेना काँग्रसमध्ये वैचारिक मतभेद असल्याबाबत विचारले असता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा शिवसेना अनेक पटीने चांगली असल्याचे के. सी पाडावी म्हणाले. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराजी तर राहणारच. मात्र, नाराज आमदारांनाही काही पदे देण्यात असेही ते म्हणाले.