मुंबई - अजित पवार हे आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी काल (शनिवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जरी असे असले तरी ते राष्ट्रवादी पासून दूर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे विश्वास मत ठरावाच्या शेवटच्या दिवशी ते मास्टर स्ट्रोक मारतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी आज व्यक्त केला.
आज सायंकाळी आठच्या सुमारास मिटकरी यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, 'काल (शनिवार) सकाळपासून सुरू झालेल्या घडामोडीनंतर अजित दादा यांना भाजपचे अनेक लोक येऊन भेटत आहेत. ज्यांचे काही भाजपसोबत हितसंबंध आहेत असे लोक दादांना भेटत आहेत. ज्यांना शरद पवार साहेबांनी मोठे केले. परंतु ते आज त्यांच्यासोबत न राहता भाजपमध्ये जाऊन बसले आहेत. या पार्श्वभूमीवर मी तातडीने येऊन अजित पवारांची भेट घेतली.'
या भेटीच्या निमित्ताने अजित पवारांवर भाजपचे नेते अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी नेत्यांचे दडपण आहे का? हे मी जाणून घेतले. मात्र आज अजित पवारांनी केलेल्या ट्विटनंतर मला त्यांच्यात काहीसा बदल जाणवला, असा विश्वासही मिटकरी यांनी व्यक्त केला.