नवी दिल्ली/मुंबई - संसदेत विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि गोव्यातील एनडीएच्या खासदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत 48 खासदार सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह हे नेते खासदारांशी चर्चा करणार आहेत. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, एनडीएच्या बैठकीवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधानांनी सभागृहात येऊन बोलावे - संसदीय अधिवेशनासाठी खासदार संजय राऊत सध्या दिल्लीत आहेत. दिल्ली येथील आपल्या शासकीय निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, मोदी सरकारच्या विरोधात 'इंडिया'ने अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर आजपासून संसदेत चर्चा सुरू आहे. अविश्वास प्रस्ताव आणण्याचे कारण स्पष्ट आहे. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून मणिपूरमध्ये जी काही परिस्थिती आहे त्यावर चर्चा करण्यासाठी सांगत होतोत. पंतप्रधानांनी सभागृहात येऊन आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे.
संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल - मणिपूरमध्ये चीनचा हस्तक्षेप असल्याचे माजी लष्करप्रमुख सांगत आहेत. अशावेळी संसदेत देशासमोर येऊन पंतप्रधानांनी आपली 'मन की बात' करणे गरजेचे होते. मात्र, तसे न होता सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. देशातील एकंदरीत परिस्थितीवर चर्चा व्हावी यासाठी अविश्वास प्रस्ताव आम्ही आणला आहे, असे खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले. आज महाराष्ट्र सदनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र आणि गोव्यातील एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडत आहे. यावरही संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.
खासदारकी सोडायला तयार - मूळ एनडीए आहे तरी कुठे? जुने मित्र पक्ष अस्तित्वात आहेत का? जे जुने सहकारी पक्ष होते ते आता आहेत का? आम्ही 'इंडिया' आघाडी स्थापन केल्यावर तुम्हाला 'एनडीए' ची आठवण आली. एनडीएचा सगळ्यात मोठा पराभव महाराष्ट्रात होणार आहे. पश्चिम बंगाल, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत भाजपाला मोठा फटाका बसेल, असे खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले. सोमवारी संसदेत सभागृहात संजय राऊत आणि अमित शाह यांच्यात खडाजंगी झाली होती. यावर राऊत म्हणाले की, त्यांनी चुकीची वाक्य माझ्या तोंडी घातली. मी तसे बोललो असेल तर खासदारकी सोडायला पण तयार आहे. मी जे म्हणालो त्यापेक्षा वेगळे आपल्या सोयीने वाक्य घातले. ते माझ्यासमोर खोटे बोलले. मला पॉईंट ऑफ ऑर्डर घ्यायची होती पण घेऊ दिली नाही.
हेही वाचा -Sharad Pawar News: शरद पवार भाजपासोबत जाणार नाहीत...ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात घेणार जाहीर सभा