मुंबई Maharashtra Weather Update : गेल्या दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झालेल्या पावसानं गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईसह कोकणात दमदार हजेरी लावली. दोन दिवसात पावसाचा जोर वाढल्यानं हवामान खात्यानं कोकण विभागाला 'यलो अलर्ट' जारी केला आहे. हवामान विभागानं कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस 'यलो अलर्ट' जारी केला. तर पालघर जिल्ह्यासाठी शनिवारी आणि रविवारी अनुक्रमे 'यलो' आणि 'ग्रीन अलर्ट' जारी करण्यात आलाय. मुंबईला आज 'ग्रीन अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
१६ जिल्ह्यांमध्ये पाण्याची कमतरता : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत मुंबईतील सांताक्रूझ इथं ७० मिमी आणि कुलाबा इथं ४६ मिमी पावसाची नोंद झाली. तर सकाळपासून पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला. अलिबागमध्ये ५२ मिमी तर रत्नागिरीत ३४ मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरमध्ये ७९ मिमी आणि नाशिकमध्ये ६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात महाबळेश्वर आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात पावसाची स्थिती चिंताजनक असून, पावसाळ्याच्या चौथ्या महिन्यातही राज्याच्या तब्बल १६ जिल्ह्यांमध्ये पाण्याची कमतरता आहे.
पुढील चार आठवड्याचा अंदाज : हवामान खात्यानं जाहीर केलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, ८ ते १४ सप्टेंबर दरम्यान कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. तर १५ ते २१ सप्टेंबर दरम्यान कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. २२ ते २८ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सरासरी पाऊस अपेक्षित आहे.
जालना जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस : सध्या महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता असून, १७ जिल्हे सरासरी श्रेणीत आहेत. जालना जिल्ह्यात सर्वाधिक ४७ टक्के पावसाची कमतरता आहे. मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा जिल्ह्यात ४० टक्के, तर अहमदनगरमध्ये ३७ टक्के पावसाची कमतरता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये ३२ टक्के, बीडमध्ये ३८ टक्के, हिंगोलीत ३७ टक्के, परभणीत ३० टक्के पावसाची तूट आहे. विदर्भातील अमरावतीमध्ये ३७ टक्के, अकोल्यात ३३ टक्के, बुलडाण्यात २३ टक्के आणि वाशिममध्ये २० टक्के पावसाची कमतरता आहे.
हेही वाचा :
- Maharashtra Rain Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सप्टेंबरमध्ये राज्यात समाधानकारक पाऊस
- Maharashtra Weather : मराठवाड्यात पावसाची दडी; शेतकरी अडचणीत, 'या' तालुक्यात भीषण पाणीटंचा