मुंबई :राज्याच्या बहुतांश भागात आतापर्यंत पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भांगात अजूनही पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. पुणे, मुंबईसह उपनगरामध्ये सध्या चांगल्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. सध्या राज्यातील कोकण विभागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर या जिल्ह्यांतही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात आजही पावसाची शक्यता वर्तविली आहे.
हवामान विभागाचा अंदाज :हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून येईल. पुढील 4,5 दिवस कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यातही आज कोणताही अलर्ट नाही, तसेच तिथे पावसाचा जोर कमी असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे, मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस होत असलेला दिसत आहे. तर काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातमध्ये देखील चांगला पाऊस कोसळत आहे.