मुंबई :रत्नागिरीजिल्ह्यात गुरुवारी दिवसभर धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट इशारा हवामान विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या सारखा पाऊस पडत आहे. जगबुडी, काजळी, वाशिष्टी या नद्या भरून वाहू लागल्या आहेत. या पावसामुळे भात रोपांची वाढ व्यवस्थित होत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात पावसामुळे ठिकठिकाणी नुकसानीच्या नोंदी देखील झाल्या आहेत. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे.
बळीराजा लावणीच्या कामात व्यस्त : राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरलेला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शेती कामांना वेग आला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे समाधानी असलेला बळीराजा लावणीच्या कामात व्यस्त झाला आहे. पाऊस तळकोकणात उशिराने दाखल झाला असला तरी सध्याचा पाऊस हा शेतीसाठी उपयुक्त आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. राज्याचा काही भाग वगळता उर्वरित क्षेत्रांमध्ये सध्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजासुद्धा सुखावला आहे.