मुंबई Maharashtra Weather :भारतीय हवामान खात्यानं (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. आयएमडीनं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला.
महाराष्ट्रात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस : पश्चिम मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातला पुढील ३ दिवसांत मुसळधार पावसाचा सामना करावा लागेल, असं आयएमडीनं 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं. तसेच उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशासह भारताच्या अनेक भागांमध्ये गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईत गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, आज रात्री आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
या भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता : हवामान खात्यानं महाराष्ट्रातील काही भाग, पूर्व उत्तर प्रदेश, दक्षिण बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवलीय. या भागांमध्ये शुक्रवारी रात्री पाऊस पडू शकतो, असं आयएमडीनं 'X' वरील पोस्टमध्ये सांगितलं.