मुंबई - कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे राज्य सरकारने राज्यात अनलॉक (maharashtra unlock) करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच स्तरांमध्ये हे अनलॉक होणार आहे. सोमवारी 7 जूनपासून राज्यात हे आदेश लागू होणार आहेत. कोणत्या टप्प्यात काय सुरू आणि काय बंद, याबाबत ईटीव्ही भारतने दिलेला सविस्तर वृत्तांत.
पहिल्या स्तरात काय सुरू राहणार, काय बंद?
दुकाने, मॉल, थिएटर, नाट्यगृह, हॉटेल, मैदाने, बगीचे, खासगी व शासकीय कार्यालय, चित्रीकरण पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहे. गॅदरिंग लग्नसोहळ्याला बंधने नसणार, अंत्यविधीसाठी देखील बंधने नाहीत. मिटिंग, बांधकाम कामे, शेतीची कामे, ई कॉमर्स सर्विस, जिम, सलुन, ब्युटी सेंटर, सार्वजनिक वाहतूक आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे सर्व पहिल्या स्तरात 100 टक्के सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. मात्र, आंतरजिल्हा प्रवासासाठी आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे. तसेच पहिल्या स्तरात जमावबंदी हटवण्यात आलेली आहे.
दुसरा स्तर -
दुसऱ्या स्तरात अत्यावश्यक सेवेतील आणि इतर दुकाने पूर्णवेळ सुरू राहण्यास मुभा आहे. मॉल थेटर आणि हॉटेल हे 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. तर बगीचे, मैदान, शासकीय आणि खाजगी कार्यालय पूर्णता क्षमतेने खुली करण्याची मुभा देण्यात आली आहे. चित्रीकरणाला देखील पूर्णक्षमतेने परवानगी असेल. लग्नसमारंभासाठी हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती अनिर्वाय असणार आहे. अंत्यविधीला सामान्य क्षमतेने उपस्थिती असल्यास परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाच्या मिटिंगला 50 टक्के उपस्थिती ठेवण्यास मुभा आहे. बांधकाम कामे, शेतीची काम, ई-कॉमर्स ही शंभर 100 क्षमतेने सुरू राहतील. जिम, सलुन, ब्युटी पार्लर ते 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक आसन क्षमतेनुसार सुरू राहील. आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास आणि आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे. तर तिथेच मॅन्युफॅक्चरिंग युनिट पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यास मुभा असेल. हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सुरू राहण्यास मुभा आहे.
तिसरा स्तर -
सर्व दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली राहण्यास मुभा आहे. मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद असतील. मैदाने आणि बगीचे सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येतील. महत्त्वाची खाजगी कार्यालय चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तर शासकीय कार्यालय 50% उपस्थितीत सुरू राहण्यास मुभा आहे. लग्नासाठी केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी, महत्त्वाच्या मिटिंगसाठी 50% उपस्थिती, केवळ बांधकाम स्थळी काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांना मुभा असेल. शेतीविषयक कामे चार वाजेपर्यंत करण्यास मुभा असेल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर पाच वाजेच्या नंतर संचारबंदी लागू होणार आहे. जिम, सलून आणि ब्युटी पार्लर सायंकाळी चार वाजेपर्यंत केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहील. सार्वजनिक वाहतूक आसन क्षमता नुसार सुरू राहील.
हेही वाचा - पाच स्तरांमध्ये निर्बंध शिथिल; वाचा, महाराष्ट्रातील अनलॉक कसा असणार?
चौथा स्तर -
अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर दुकाने, थिएटर्स, मॉल आणि नाट्यगृह पूर्णता बंद राहतील. हॉटेलमध्ये केवल पार्सल सेवा सुरू ठेवण्यात येईल. मैदाने, बगीचे सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली राहतील. मात्र, विक एन्ड लॉकडाऊनला मैदाने आणि बगीचे बंद राहतील. खासगी कार्यालय बंद राहतील. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कार्यालय सुरू ठेवण्यास मुभा असेल. तर शासकीय कार्यालयात केवळ 25 टक्के उपस्थिती असणार आहे. लग्नसोहळ्यासाठी 25 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. केवळ बांधकाम साईटवरच्या मजूर आणि कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. संचार बंदी लागू असेल. जिम सलून आणि ब्युटी पार्लरची दुकाने चार वाजेपर्यंत खुली ठेवण्यात मुभा देण्यात आली आहे. मात्र, 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहून केवळ लसीकरण झालेल्या गिर्हाईकांना सेवा देता येणार आहे. सार्वजनिक वाहतूक आसन क्षमतेनुसार सुरू राहील. तसेच मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये केवळ 50 टक्के कामगार उपस्थितीत काम सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे.
पाचवा स्तर -
अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल, थिएटर्स, नाट्यगृह आणि इतर दुकाने पूर्णता बंद राहतील. हॉटेल्सला केवळ होम डिलिव्हरी देण्याची मुभा आहे. मैदाने, बगीचे पूर्णता बंद असतील. अत्यावश्यक सेवेतील खासगी कार्यालय खुली ठेवण्यात केवळ मुभा दिली आहे. शासकीय कार्यालय 15% उपस्थित सुरू राहतील. चित्रीकरण पूर्णता बंद राहणार. लग्नसोहळा केवळ कुटुंबीयांच्या उपस्थित करावा लागेल. अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांना मुभा देण्यात आली आहे. तसेच शेतीविषयक दुकाने आणि कामे चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. पाचव्या स्तरात संचारबंदी लागू असेल. जिम, सलुन, ब्युटी पार्लर पूर्णता बंद राहतील. सार्वजनिक वाहतूक 50% आसन क्षमतेनुसार चालेल. मेडिकल इमर्जन्सी असल्याशिवाय आंतरजिल्हा प्रवास करता येणार नाही. प्रोडक्शन युनिट 50 टक्के क्षमतेनुसार चालवता येईल.
मुंबईतील लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईतली लोकल सध्या सुरू केली जाणार नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा तपासला जाईल आणि त्यानुसार त्या जिल्ह्याला त्या त्या लेव्हल नुसार सूट दिली जाणार आहे. त्यामुळे येणारा काळात मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट झपाट्याने कमी झाला तर नक्कीच मुंबईकरांना लोकल सेवा खुली केली जाईल असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात आले आहे.
हेही वाचा -राज्यात नव्या 14 हजार 152 रुग्णांची नोंद