मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये आदिवासी महिलेने दाखल केलेल्या धर्मांतरविरोधी तक्रारीबाबत विधान परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील धर्मांतराचे प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. राज्यात अनेक धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या नावाखाली सरकारी नोकरी लाटल्याचा आरोप पडळकर यांनी केला. विधान परिषदेत या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय सदस्यांनी तक्रारींचा पाढा वाचला आहे.
धर्मांतराची प्रकरणे सभागृहात मांडली : सरकारने स्थापन केलेल्या अंतरधर्मीय विवाह परिवार समितीकडे आतापर्यंत किती तक्रारी आल्या असून, त्यावर सरकारने काय कारवाई केली आहे, याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. आमदार मनीषा कायंदे, भाई जगताप, प्रवीण दरेकर, उमा खापरे यांनी चर्चेत भाग घेऊन उपप्रश्न विचारत लव्ह जिहाद आणि धर्मांतराची प्रकरणे सभागृहात मांडली आहे.
धर्मांतर तसेच लव्ह जिहाद विरोधात कायदा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले. धर्मांतर कायदा संदर्भात न्यायलयात याचिका दाखल आहे. सर्वोच्च न्यायालयातून यावर निर्णय येईल. बळजबरीने धर्मांतर किंवा लव्ह जिहाद तक्रारी येत असतील तर त्याचा आढावा घेतला जाईल. मात्र, बळजबरीने धर्मांतर करता येत नाही. धर्मांतर तसेच लव्ह जिहाद विरोधात कायदा व्हावा अशा मागण्या पुढे येत आहेत. यावर या पूर्वी ज्या राज्यांनी लव्ह जिहादचा कायदा केला आहे, अशा राज्यातील त्या कायद्याचा अभ्यास केला जाईल असही ते म्हणाले आहेत.
दोघांमध्ये पुन्हा संवाद घडवून आणण्यासाठी समिती : लव्ह जिहाद कायद्यासाठी सरकार सकारात्मक असून पोलीस महासंचालकांना सांगून एसओपी तयार केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच आंतरधर्मीय समिती केवळ श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर पालक आणि मुलीमध्ये संपर्क स्थापन करून दोघांमध्ये पुन्हा संवाद घडवून आणण्यासाठी समिती नेमली आहे. श्रद्धाला वेळेत मदत मिळाली असती तर श्रद्धाची हत्या रोखता आले असते. मात्र, सध्या किती तक्रारी आल्या आहेत, याची माहिती माझ्याकडे नाही, असे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.