मुंबई -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील वाद काही थांबताना दिसत नाही. उलटपक्षी या वादात रोज नवीन अंक जोडला जाऊन, हा वाद विकोपाला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. आज या वादाच्या अंकात नवी भर पाडली असून राजभवनावरील हेलिपॅड वापरणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळले आहे. काल (गुरुवारी) 11 फेब्रुवारीला राज्यपाल यांना उत्तराखंड येथे कार्यक्रमानिम्मित जायचे होते. मात्र, त्यांच्या विमान प्रवासाला राज्यसरकारकडून नकार कळवण्यात आला. त्यामुळे राज्यपालांना चक्क विमानातून खाली उतरण्याची नामुष्की आली. त्यानंतर राजकीय बराच वादही पेटला. त्यामुळे आज राजभवनावर जाऊन तेथील हेलिपॅड वापरणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळले आहे.
याबाबत माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पालघरमध्ये नियोजित दौरा असून वर्षा बंगला येथून मुख्यमंत्री थेट महालक्ष्मी रेसकोर्सच्या हेलिपॅडच्या दिशेने निघाले. मुख्यमंत्र्यांचे निवस्थान आणि कार्यालय असलेला वर्षा बंगला आणि राजभवन हे अंतर अगदी हाकेच्या अंतरावर असूनही पुन्हा राज्यपाल आणि मुख्यमंत्री वाद होऊ नये, याची दक्षता घेत त्यांनी राजभवनावर जाणे टाळले.
राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यातील वाद -
महाविकास आघाडीचे सरकार निर्माण झाल्या पासूनच राज्यपाल आणि राज्यसरकार यांच्यात काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा शपथ विधीपासून ते आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनातील हेलिपॅड टाळण्यापर्यंत हे वाद सुरू आहेत.
राज्यपाल हे संविधानिक पद असून या पदाची गरीमा राज्यपालांकडून राखली जात नाही आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचा अजेंडा रेटण्याचं काम राज्यपाल करत असल्याचा आरोपही वेळोवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. राज्यपालांनी भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी उरकवला आणि तेव्हापासून या वादाला सुरवात झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अगदी मध्यरात्रीतून राज्यपालांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी राष्ट्रपती राजवट उठवून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी उरकवला. यानंतर राज्यपाल नेमके कोणासाठी काम करत आहेत? हा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला. तेव्हापासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा -'माझ्यामागे ईडी लावली, सीडी लावण्याचे काम अजून बाकी आहे' एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा
महाविकास आघाडीच्या शपथविधीवर राज्यपालांची नाराजी -
महाविकास आघाडीच्या शपथविधीवेळीही राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात द्वंद्व युद्ध समोर आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी दादारच्या शिवजीपार्क मैदानात पार पडला. मुख्यमंत्री यांनी शपथविधी नंतर महापुरुषांची नावे घेतल्याचे राज्यपालांना खटले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी पार पडत असताना, काँग्रेसचे मंत्री के. सी. पाडवी यांनी देखील महापुरुषांची नावे घेतल्याने मी ही शपथ संविधानिक मनात नाही, शपथ पुन्हा घ्यावी लागेल, असे म्हणत पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला राज्यपालांनी भाग पाडले. त्यामुळे राज्यपालांवर त्या वेळीही नाराजी व्यक्त करण्यात आली.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या पत्राला राज्यपालांकडून केराची टोपली -
विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचे पत्र महाविकास आघाडीकडून देऊन जवळ जवळ तीन महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप या पत्रावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केली नसल्याने मुख्यमंत्री सह सर्वच मंत्री राज्यपालांवर नाराज आहेत. या सदस्यांच्या पत्रावर नेमके कधी स्वाक्षरी करायची हा अधिकार राज्यपालांचा असला तरी एवढा वेळ लागायला नको, असे महाविकास आघाडीचे नेते वारंवार बोलताना दिसत आहेत.
कोरोना काळात बंद करण्यात आलेला मंदिर उघडण्यास राज्यसरकार उशीर करत आहे, अशा आशयाचे पत्र थेट राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. त्यावर देखील सरकारने आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच राज्य सरकार जो काही निर्णय घेत आहे, त्यावर राज्यपाल नेहमीच टीका करताना दिसतात. त्यामुळे राज्यपाल संविधान पदावर बसून भाजपचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या सरकारने वेळोवेळी केला आहे. त्यात आत राज्यपालांना हवाई सफर नाकारणे आणि मुख्यमंत्री यांनी राजभवनावर जाणे टाळणे हे अंक जोडले गेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात हे वाद कमी न होता वाढण्याचे संकेत आहेत, असेच दिसत आहे.