मुंबई- महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठिक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
धनंजय मुंडे यांना यापूर्वीही म्हणजे गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र, मंगळवारी पुन्हा एकदा कोरोनाच्या विषाणूने धनंजय मुंडे बाधित झाले आहेत.
या संदर्भात ट्विट करत मुंडे यांनी म्हटले आहे की, 'माझी आज(मंगळवारी) दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी, ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी,' असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.
आदित्य ठाकरेंनंतर रश्मी ठाकरेही कोरोना पॉझिटिव्ह
गेल्या तीन दिवसात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी देखील ट्विट करून कोरोना झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रश्मी ठाकरे या विलगणीकरणात आहेत.
मंगळवारी राज्यात 28 हजार 699 कोरोनाबाधितांची नोंद, 132 जणांचा मृत्यू
राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी तब्बल 28 हजार 699 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर 132 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदराचे प्रमाण 2.12 टक्के एवढे आहे.
राज्यातील कोरोनास्थिती
राज्यात मंगळवारी दिवसभरात तब्बल 28 हजार 699 कोरोबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 25 लाख 33 हजार 26 वर पोहोचला आहे. आज 13 हजार 165 जणांनी कोरोनावर मात केल्याने राज्यातील कोरोनामुक्तांची एकूण संख्या 22 लाख 47 हजार 495 वर पोहोचली आहे. तर आज कोरोनामुळे 132 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदराचे प्रमाण 2.12 टक्के एवढे आहे. दरम्यान राज्यात सध्या 2 लाख 30 हजार 641 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.