मुंबई : राज्यातील अनेक भागात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. राज्यातील अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावासामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यात पुढील 4 अजून मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज दिवसभरात मध्यम ते मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफने राज्यात एकूण 12 टीम तैनात केल्या आहेत. मुंबईत 5, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, नागपूर आणि ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी 1 टीम तैनात करण्यात आली आहे. एनडीआरएफची टीम नैसर्गिक आपत्तीमधून नागरिकांची सुटका करणे व त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे काम करणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
मुसळधार पावसाची शक्यता : राज्यात आज मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पुणे, सातारा, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तळ कोकणात देखील अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.