मुंबई:भारतीय हवामान विभागाने रायगड पुण्यासह आठ जिल्ह्यांना आज ( 23 जुलै) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर 24 जुलैला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
यवतमाळमधून पुरात अडकलेल्या शंभरहून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे बुलढाणा येथे तीन गावांचा संपर्क तुटला आहे. अकोला जिल्ह्यात अकोला व तेल्हारा सर्वाधिक फटका बसला आहे. वाशिममध्ये पूर आल्याने घर आणि शेतीचे नुकसान झाले आहे. गोसेखुर्द धरणाचे उघडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कणकवली तालुक्यात पूर स्थिती आहे. गड नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळळधार पाऊस सुरुच आहे.
पुरासह वीजेच्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू-विदर्भातील नागपूर विभागात 13 जुलैपासून पुरासह वीजेच्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अतिवृष्टीमुळे 1,600 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तर 39 जनावरांचा पावसाच्या तडाख्यात मृत्यू झाला आहे. नागपूर विभागातील 875.84 हेक्टर शेतजमिनीवरही पावसाचा परिणाम झाला. यात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा व चंद्रपूर या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गडचिरोली आणि भंडारा येथे प्रत्येकी तीन, वर्धा आणि गोंदियामध्ये प्रत्येकी दोन आणि चंद्रपूरमध्ये एका मृत्यूची नोंद झाली आहे.
सुमारे 111 जणांची शनिवारी सुटका -पाऊस आणि पुरामुळे नागपूर विभागातील 875.84 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. तर चंद्रपूरमधील 853.74 हेक्टर आणि वर्ध्यातील 22.1 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात अकोल्यात 107.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा गावात पुरामुळे अडकलेल्या सुमारे 111 जणांची शनिवारी सुटका करण्यात आली. आज यवतमाळमधील अनेक भागात पुराचे पाणी ओसरले आणि पावसाचा जोरही कमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनिल पाटील यांनी रविवारी यवतमाळला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
ठाणे जिल्ह्यात सरासरी 140 ते 150 टक्के पाऊस-ठाणे जिल्हा प्रशासनाने 1,200 हून अधिक लोकांना धोकादायक इमारतीमधून बाहेर काढले आहे. त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था केली आहे. मात्र, यातील 750 रहिवासी आपापल्या घरी परतले आहे. ठाणे जिल्ह्यात सरासरी 140 ते 150 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या तीन दिवसांत तीन जणांनी जीव गमवावा लागला असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पावसाळ्यात विविध दुर्घटनांमध्ये एकूण 22 मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील काळू आणि उल्हास नद्या धोक्याच्या चिन्हाखाली वाहत असून धरणेही भरू लागली आहेत. महाराष्ट्रातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि वसई तालुक्यातील गावांना तानसा धरणातून संभाव्य पाण्याचा विसर्ग लक्षात घेता सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता -सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या आजूबाजूला आणि (तानसा) नदीच्या काठावर वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात पुरामुळे अडकलेल्या सुमारे 110 जणांची शनिवारी सुटका करण्यात आली. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) सोबतच, आनंदनगर तांडा गावात बचाव कार्यासाठी भारतीय वायुसेनेचे Mi-17 V5 हेलिकॉप्टर देखील नागरिकांची सुटका करण्यासाठी पाठविल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. महागाव तहसीलमध्ये मध्यरात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत 231 मिमी पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्यात 117.5 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली.