महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खुशखबर.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नवीन वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - MPSC 2020 Exam Schedule

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२० मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

By

Published : Nov 22, 2019, 6:23 PM IST

Updated : Nov 22, 2019, 7:03 PM IST

मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२० मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या वेळापत्रकानुसार राज्य सेवा परीक्षा २०२० साठीची मुख्य परीक्षा शनिवारपासून तीन दिवस आणि सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय परीक्षा ही शनिवारी घेण्यात येणार आहे. तर उर्वरित सर्व पूर्व तसेच मुख्य परीक्षा रविवारी घेण्याचे नियोजित आहे.

राज्य सेवा परीक्षा २०२० साठीची जाहिरात डिसेंबर २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा दिनांक ५ एप्रिल २०२० रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार दिनांक ८ ऑगस्ट ते सोमवार दि. १० ऑगस्ट, २०२० अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे. दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेसाठी जानेवारी २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. १ मार्च रोजी तर मुख्य परीक्षा दि. १४ जून २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२० साठी जानेवारी २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा दि. १५ मार्च, २०२० रोजी तर मुख्य परीक्षा दिनांक १२ जुलै २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठी फेब्रुवारी २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दिनांक ३ मे २०२० रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक १- दिनांक ६ सप्टेंबर २०२० रोजी, पेपर क्र. २ (पोलीस उपनिरीक्षक)- दिनांक १३ सप्टेंबर २०२० , पेपर क्रमांक २ (राज्य कर निरीक्षक)- दिनांक २७ सप्टेंबर २०२० , पेपर क्र. २ ( सहायक कक्ष अधिकारी)- दिनांक ४ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०२० साठी मार्च २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून पूर्व परीक्षा दिनांक १० मे रोजी तर मुख्य परीक्षा दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी मार्च २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक १७ मे २०२० मध्ये घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दिनांक‍ १८ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा २०२० साठी एप्रिल २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. ७ जून २०२० रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेअंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक १- दि. २९ नोव्हेंबर २०२० रोजी, संयुक्त पेपर क्रमांक २ (लिपिक-टंकलेखक)- दि. ६ डिसेंबर २०२० , संयुक्त पेपर क्रमांक २ (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क)- दि. १३ डिसेंबर २०२० रोजी तर संयुक्त पेपर क्रमांक २ (कर सहायक)- दि. २० डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा २०२० साठी मे २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा दि. ५ जुलै रोजी तर मुख्य परीक्षा दि. १ नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्याचे नियोजित आहे. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२० साठी सप्टेंबर, २०२० मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून परीक्षा शनिवार दिनांक २८ नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्याचे नियोजित आहे. परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Last Updated : Nov 22, 2019, 7:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details