मुंबई Political Analysis :अनेक दशकानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाजवादी पक्षांशी केलेली जवळीक ही भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. सध्या राज्यातीलच नाही तर देशातील राजकीय परिस्थिती आणि पुढील वर्षी होवू घातलेल्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पाहता प्रत्येक पक्षासाठी मतदारांपर्यंत पोहोचणे गरजेचं झालंय.
अनेक दशकानंतर समाजवादी पक्ष पुन्हा एकदा शिवसेनेबरोबर आल्यानं याचा फायदा नक्कीच दोन्ही बाजूला होईल यात शंका नाही. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पडलेली फुट आणि त्या फुटीनंतर रसातळाला गेलेल्या शिवसेना पक्षाला पुन्हा उभारी घेण्यासाठी समाजवादीची साथ लाख मोलाची ठरणार आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवरून त्यांच्यावर भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका जरी होत असली, तरीसुद्धा आजच्या घडीला त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर द्यायला सुद्धा उद्धव ठाकरे तयार आहेत.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही काळाची गरज :उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, त्यानंतर संभाजी ब्रिगेड आणि आता समाजवादी विचारसरणीच्या २१ पक्षांसोबत हातमिळवणी केली आहे. या मागचं प्रमुख कारण म्हणजे १९ जून १९६६ रोजी स्थापन झालेल्या शिवसेनेला कधी नव्हे ते ४६ वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या फुटीने पूर्णत: खिंडार पडले. यापूर्वी छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईक, राम जेठमलानी, हेमचंद्र गुप्ते यांसारखे नेते शिवसेनेतून बंड करत बाहेर पडले. पण त्याचा शिवसेनेवर तसा काही फार मोठा परिणाम झाला नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत हे सर्व झालं होतं.
ठाकरे गटासाठी काळाची गरज-आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड करत ४० आमदारांच्या समर्थनासह शिवसेनेत उभी फूट पाडली. शिंदे इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी खासदारांमध्येही फूट पाडत १३ खासदार आपल्या बाजूनं ते घेऊन गेले. अशाप्रसंगी पूर्णतः ढासळलेल्या शिवसेनेला शून्यातून पुन्हा उभारी करणे गरजेचं आहे. याच कारणानं शिवसेनेनं प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी बरोबर, तसंच संभाजी ब्रिगेड आणि आता समाजवादी नेत्यांशी जवळीक साधत पुन्हा उभारी घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. शिवसेनेसाठी ही फार महत्त्वाची बाब असली तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही काळाची गरज असल्याचं खुद्द उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.
युतीचे जोशी, राणे, फडणवीस मुख्यमंत्री :शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच पदाची अपेक्षा केली नाही. परंतु सत्तेचा रिमोट कंट्रोल त्यांनी आपल्या हातातच ठेवला. या उलट उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद व त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी मंत्रीपद भूषविले. १९९५ साली शिवसेना आणि भाजपा युतीची पहिल्यांदा महाराष्ट्रात सत्ता आली तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी हे युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मनोहर जोशी यांच्यानंतर दुसऱ्यांदा अल्पकाळासाठी नारायण राणे हे युतीचे दुसरे मुख्यमंत्री झाले. तर २०१४ साली शिवसेनेनं भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस या युतीचे तिसरे मुख्यमंत्री झाले. मात्र, २०१९ साली शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यानं उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यानंतर अडीच वर्षातच एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळं राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं.
युती, मैत्री आणि बिघाडी : शिवसेनेनं त्यांच्या सुरुवातीच्या काळात काँग्रेसशी सुद्धा अनेक निवडणुकांत मैत्री ठेवली होती. १९८० साली काँग्रेसला मदत केल्याबद्दल शिवसेनेला तेव्हा विधान परिषदेवर दोन जागा देण्यात आल्या होत्या. तर १९८४ साली शिवसेनेनं भाजपासोबत युती केली. परंतु त्यानंतर भाजपा पुलोदमध्ये सहभागी झाल्यानंतर ही युती तुटली. तेव्हा 'कमळाबाई' आम्हाला सोडून गेल्या, अशी खोचक टीका बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर १९८९ साली भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा युती झाली. ही युती पुढे २५ वर्षे टिकली. २०१४ साली भाजपा व शिवसेना दोन्ही पक्षांनी विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या. परंतु निकालानंतर ते पुन्हा एकत्र आले. २०१९ साली शिवसेना आणि भाजपा यांची पुन्हा युती झाली. परंतु अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या वादावरून ही युती तुटली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. तर सर्वात जास्त आमदार निवडून आलेल्या भाजपा पक्षाला विरोधी पक्षात बसावं लागलं.
रसातळाला गेलेल्या पक्षाच्या उभारणीसाठी : उद्धव ठाकरेंना समाजवादी जनता परिवारातील २१ संघटनेबरोबर जनता दल, आरजेडी यांच्या नेत्यांचाही सहयोग लाभला आहे. मुंबईतील बैठकीला या सर्व संघटनांचे नेते, आरोग्य सेनेचे डॉक्टर अभिजीत वैद्य, राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, जनता दल युनिटचे राष्ट्रीय अध्यक्ष शशांक राव, मुस्लिम ओबीसी नेते शब्बीर अंसारी आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे हे सर्व उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका-उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसंच आणीबाणी विरोधी संघर्ष करताना समाजवादीच आघाडीवर होती असं सांगत समाजवादी नेत्यांच कौतुक केलं. तर दुसरीकडं या सर्व प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठे होता? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. इतकंच नाही तर बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि नितेश कुमार यांच्यात बिघाडी करण्याचं काम ज्यांनी केलंय, तेच महाराष्ट्रात युती तोडण्यासाठी पुढे आहेत. असं म्हणून त्यांच्यापासून अंतर ठेवा असं सांगत ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला. आताच्या घडीला उद्धव ठाकरे यांना हे सर्व करणं सुद्धा क्रमप्राप्तच आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनं शेवटी रसातळाला गेलेल्या पक्षाच्या उभारणीसाठी त्यांना या सर्व गोष्टींची गरज आहे.
नितेश राणेंनी केली टीका : उद्धव ठाकरे यांच्या समाजवादी भूमिकेवर भाजपाकडून सडकून टीका केली जाते. याबाबत बोलताना भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी समाजवादी विचार स्वीकारलाच आहे. त्यांचे खासदार संजय राऊत आपल्या भाषणामध्ये म्हणालेत की, हिंदुत्व विचारापेक्षा समाजवादी विचार जास्त प्रभावी आहेत. तर आता उद्धव ठाकरे यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, इसीस, रजा अकादमी, एमआयएम यांच्याबरोबरसुद्धा युती करायला हरकत नाही. जे देशाच्या विरोधात असतात ते उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समाजवादी विचारांच्या विरोधात पूर्ण राजकीय प्रवास करून महाराष्ट्रात इतिहास घडवला. मराठी माणसाला मान सन्मान मिळून दिला. त्या समाजवादी विचारांच्या लोकांबरोबर खांद्याला खांदा लावून उद्धव ठाकरे बसतात हे फार घातक असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- Uddhav Thackeray : समाजवादी परिवार अन् शिवसेना एकत्र; उद्धव ठाकरेंचा भाजपासह 'आरएसएस'वर हल्लाबोल
- Nitesh Rane : ...तर उद्धव ठाकरेंना जबाबदार ठरवायचं का? नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल
- Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेना आमदार अपात्र प्रकरण ; 20 तारखेला होणार पुढील सुनावणी, आमदार म्हणाले . . .