मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वीच भाजप व शिंदे गटात विवाद सुरू झाला आहे आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेटपदी आपली वर्णी लागावी, यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
शिंदे गटाचे पाच मंत्री निशाण्यावर :सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबला तरी चालेल. पण मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल. विशेष म्हणजे हे पाचही मंत्री शिंदे गटाचे असल्याचेही समोर आले आहे. शिंदे गटाच्या या पाच मंत्र्यांमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार,आरोग्य मंत्री तानाजी सावंत, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. या पाच जणांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात दबाव आहे. प्रत्यक्षात कुठल्याही पद्धतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव नसल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले. तसेच कोणालाही मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार नाही, असे शिंदे गटाने म्हटले आहे.
थेट मंत्र्यांवर आरोप-याविषयी बोलताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मंत्र्यांवर, त्यांच्या खात्यांवार तक्रारी होत असतात. परंतु पहिल्यांदा मंत्र्याचा थेट समावेश असलेले आरोप झालेले आहेत. कृषी विभागात थेट आरोप मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर झाले. मंत्री दादा भुसे यांच्या साखर कारखान्यावरही आरोप झाले आहेत. मेडिकल असोसिएशनने थेट मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. आतापर्यंत खात्यांवर व अधिकाऱ्यांवर आरोप व्हायचे. परंतु थेट व्यक्तिशः मंत्र्यांवर आरोप पहिल्यांदाच होत आहेत. मंत्र्यांवर आरोप करणे सोपे नसते. पण काही तथ्य असल्याने आरोप होत आहेत. असे मंत्री घेऊन हे सरकार चालवत आहेत, असेही दानवे म्हणाले आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख व शिवसेना नेते संजय राऊत यांचा काही संबंध नसताना त्यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या. मग आता तुमचे सरकार आहे. यांच्यावर कारवाई करण्यास तयार नसाल तरी यांचे मंत्रिपद तरी काढून घ्या-विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
मंत्र्यांना डच्चू देण्यासाठी भाजपकडून दबाव का?अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, आणि संजय राठोड हे पाचही मंत्री सरकार स्थापन झाल्यापासून कुठल्या ना कुठल्यातरी कारणाने कायम वादात सापडले आहेत. आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत यांची कामगिरी तशी फारशी समाधानकारक राहिली नाही. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सुरवातीपासूनच सर्वाधिक वादात सापडलेले मंत्री आहेत. मध्यंतरी जमिनीच्या प्रकरणात मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले होते. सोबतच खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याने अब्दुल सत्तार टीकेचे धनी झाले होते. कृषी खात्यापेक्षा अन्य गोष्टींसाठीच सत्तार यांचे नाव नेहमी चर्चेत राहिले आहे.
पहिल्यापासून वादग्रस्त राहिले मंत्री -जळगावचे पालकमंत्री, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री, गुलाबराव पाटील यांच्यावर मंत्री म्हणून निष्क्रियतेचा आरोप केला जातो. पाटील यांच्याच मतदारसंघातील अनेक गावे पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. तसेच ते कापूसकोंडी फोडण्यात अपयशी ठरले आहेत. हंगामातील ३० ते ४० टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून राहिला आहे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या कामकाजा विषयी भाजपच्या गोटात मोठी नाराजी आहे. तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री, संजय राठोड यांचा मंत्रिमंडळातील सहभाग हा पहिल्या दिवसापासूनच वादग्रस्त ठरला आहे. एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणात संजय राठोड यांच्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आरोप केले होते. तरीदेखील संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. तसेच त्यांच्याकडे असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागातील भ्रष्टाचाराबाबत राज्यातील औषध विक्रेत्यांच्या संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या कारणाने तेही मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता धरू शकतात.
शिंदे गट व भाजपमध्ये कोणते आहेत वाद?- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. तर भाजपकडून ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपचे आमदार संजय केळकर व मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपचाच असल्याचे ठासून सांगितले आहे. त्याचबरोबर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीची तयारी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे तथाकथित हितचिंतकाने माध्यमात दिलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहून अधिक लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे. त्यावरून भाजपमधील नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे.
हेही वाचा-
- Maharashtra Politics: भाजपबरोबरील लोकसभेच्या जागेच्या तिढ्यानंतर वादग्रस्त जाहिरात, खासदार एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना
- Eknath Shinde : 'फोटो असो किंवा नसो, लोकांच्या मनात आम्हीच' ; जाहिरातीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
- Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यावर भाजप आमदार-मंत्र्यांचा दावा, पहा कोण काय म्हणाले?