मुंबई :शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील जनतेने या सरकारला भरभरून प्रतिसाद दिला आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्यात या सरकारने यश मिळवले आहे. त्या अनुषंगाने जनतेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी येत्या आजपासून मुंबईतील प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली. मुंबईतील लोकसभेच्या सर्व मतदारसंघांमध्ये जाऊन जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे पुढील वाटचालीसाठी दिशा ठरवण्यासाठी आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेमध्ये शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने संयुक्तरीत्या लोकांसमोर जाणार आहोत, असेही शेलार यांनी सांगितले.
प्रत्येक मतदार संघातील मंदिराला देणार भेट :या यात्रेदरम्यान प्रत्येक मतदारसंघातील एका मोठ्या मंदिराला भेट देण्यात येईल. जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेऊन हे सरकार पुढे वाटचाल करणार आहे. त्यासाठीच यात्रा असल्याचे शेलार यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात काढलेले उद्गार अयोग्य आहेत. 370 मोदींनी हटवले, त्यामुळे राहुल गांधी त्यांच्या बहिणीसोबत श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रा काढू शकले, असेही शेलार म्हणाले.
मला आतापर्यंत नऊ धमक्या :संजय राऊत निराश झाले आहेत. माणुस जेव्हा हताश होतो तेव्हा तो शिवीगाळ करतो, आता त्यामुळे संजय राऊत असे बोलतात. उद्धव ठाकरेंचा पक्ष कामाला लागला आहे. उद्धव ठाकरे आता कुणाला साद घालत आहेत? कधी मुस्लिम मराठी, मराठी मुस्लिम असे शब्द प्रयोग सुरू आहेत, असे ते म्हणाले. मला आणि माझ्या पत्नीला घाणेरड्या धमक्यांचे पत्र आले. त्यात सुद्धा हीच लोक आहेत का? तपासून पाहायला हवे. मला आतापर्यंत नऊ धमक्या आलेल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
इम्तियाज जलील यांचा नामांतराला विरोध : संभाजीनगर नावाला विरोध करणारा इम्तियाज जलील कोण आहे? इम्तियाज जलील यांचा नामांतराला विरोध आहे. पण मला चिंता आहे, त्यांना खैरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाचा एखादा नेता त्यांना पाठिंबा द्यायला गेला नाही म्हणजे मिळवले. स्वप्न बघायला कोणताही टॅक्स नाही. ठाकरे गटाला अशी स्वप्न बघू दे. आम्ही त्यांना कोणताही टॅक्स लावणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दारूवर असलेला टॅक्स कमी केला होता. कदाचित केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत सुद्धा येतील, असेही शेलार यावेळी म्हणाले.
हेही वाचा : Kirit Somaiya News: किरीट सोमैय्या यांच्या कार्यालयात श्रवण यंत्र घोटाळा; नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल