मुंबई- या महाराष्ट्रामध्ये घाशीराम कोतवालांच राज्य सुरू आहे. तीन घाशीराम कोतवाल राज्य करत आहेत. पेशवे काळातील घाशीराम कोतवालांचा कार्यकाळ बघा. त्यांनी लुटमार आणि दरोडेखोरी केली. घाशीराम कोतवाल यांच्यावरत पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी होती. लुटमार करून ते वरिष्ठांना पैसे पोचवायचे. घाशीराम कोतवाल नाटक महाराष्ट्रात खूप गाजलं आहे. ती एक विकृती होती. आज महाराष्ट्रात घाशीराम कोतवाल राज्य असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी सामनाच्या संपादकीय लेखातून भाजपा आणि मित्र पक्षांवर टीका केली आहे. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा छाती फुटेपर्यंत नैतिकतेचे फुगे फुगवत आहे. त्यांच्याकडे नैतिकता तरी शिल्लक आहे का? म्हणून आज आम्ही म्हटलं आहे की, नैतिकतेचं ऑडिट केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं ऑडिट होतं. काय खरं? काय खोटं? कुठे काय मुरलं? या सगळ्याचं ऑडिट होतं. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा नैतिकतेचे ऑडिट होणं गरजेचं आहे. नवाब मलिक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिण्याचं एक नाटक केलं आहे.
तुम्ही सगळे नवाब मलिक यांचे बाप-पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "जर तुमच्यात खरंच नैतिकता असेल तर मग प्रफुल पटेल यांच्या विषयी काय भूमिका आहे? दोघांचे अपराधसारखे आहेत. प्रफुल पटेल हे अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. आम्ही नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतात. मग तुम्ही कशाला काय लावत आहेत? आज सकाळी शिंदे गटाचा पोपट बोलत होता. आम्ही मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. अरे मग, तुम्ही सगळे नवाब मलिक यांचे बाप आहेत. बेईमान आणि गद्दार लोक आहात.