मुंबई : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासोबत बोलायला मध्यस्थींची गरज नाही. राज ठाकरे यांचे हिंदुत्व मला माहित आहे. भले आमचे रस्ते वेगळे झाले असले तरी आमचे इमोशनल अटॅचमेंट आजही आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे दोन्ही भाऊ आहेत. कधीही बोलू शकतात. आम्हीपण त्यांच्याशी बोलू शकतो. चर्चा घडवण्यासाठी या नौटंकी केल्या जातात. आम्ही कोणालाही आमंत्रण दिले नाही.
राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोघेही भाऊ आहेत. सगळ्यांना माहित आहे. राज ठाकरे व संजय राऊत यांची मैत्री ही सगळ्यांना माहित आहे. मी आमच्या पक्षाची भूमिका मांडत असतो. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. आम्ही आमच्या आमच्या परीने काम करतो. आम्हाला एकमेकांशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची व कोणत्याही नाटकाची गरज नाही. ज्या चर्चा झाल्या या संदर्भात आम्ही सविस्तर बोललो. त्यांचे काय म्हणणं आहे ते मी तुम्हाला का सांगू? आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे.
शिंदे गटाचे नाराज आमदार संपर्कात-अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटात नाराजी पसरली असल्याच्या चर्चा आहेत. या नाराजीमुळे शिंदे गटाचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, कालपासून मी सांगतोय सतरा ते अठरा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. जसे अजित पवार बोलले, मी खोटे बोललो तर पवार नाव लागणार नाही. तसे आम्ही सांगतो की पुन्हा शिवसेना नाव घेणार नाही. त्यांचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या व्यथा ते आमच्याकडे मांडत आहेत. आताही माझ्याशी चार आमदार बोलले आहेत. आम्ही ऐकण्याचे काम करतो. आमचेच जुने सहकारी आहेत. आमच्याबरोबर त्यांनी काम केले असून त्यांच्याशी संबंध आहेत. मागच्या आठ दिवसापासून ते संपर्कात आहेत. त्यांना घ्यायचे की नाही तो निर्णय पक्षप्रमुखांचा आहे. पण ते संपर्कात आहेत.