मुंबई : राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये खळबळ माजवून देणाऱ्या शरद पवार यांच्या राजीनामानाट्य नंतर सुप्रिया सुळे ह्या त्यांच्या राजकीय वारसदार होतील अशी जोरदार चर्चा पक्षात आणि विविध स्तरावर सुरू होती. मात्र शरद पवार यांनी पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यामुळे ही चर्चा आता तूर्तास का होईना थांबली आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वत:हून आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितल्याने आता चर्चेला नवीन वळण मिळाले आहे. सुप्रिया सुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे शरद पवार यांनीही सांगितले आहे.
काय म्हणाले शरद पवार? : भविष्यात लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी पक्षाला कशा प्रकारे वाढवता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. सध्या पक्षाचे चारच खासदार आहेत. हा एक अंकी आकडा कसा दोन अंकात नेता येईल ह्या दृष्टीकोनातून पक्ष मतदारांशी जोडलेला असणे गरजेचे आहे. त्यासोबत त्यांच्या बारामती मतदारसंघावर त्यांचे बारीक लक्ष आहे. आपण स्वत:हून जबादारी घ्यायची तयारी देखील असावी लागते. त्यामुळे मतदारांशिवाय कोणतीही जबाबदारी आपण स्वीकारू इच्छित नाही असे सुप्रिया यांनी कळवले असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.