मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमादरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पक्ष संघटनेची जबाबदारी माझ्यावर द्यावी विरोधी पक्ष पदावरून मला मुक्त करावे, असे आवाहन करून अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्ष पदाची मागणी केली. त्यादृष्टीने आज हालचालींना वेग आला असून अजित पवारांच्या निवासस्थानी बैठकीसाठी आमदार आणि नेते यांची बैठक सुरू आहे.
छोटेखानी कार्यक्रम? राष्ट्रवादीतील आमदार मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीतील काही आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजूनही निर्णय न झाल्याने ही बैठक घेतल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत सूतोवाच करून देखील अद्याप निर्णय नाही. देवगिरी शासकीय बंगल्यावर छोटेखानी खासगी कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले असल्याचे समजते.
मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात -अजित पवार यांच्या निवासस्थानी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अमोल कोल्हे, धनंजय मुंडे, धनंजय मुंडे,आमदार किरण लहामाटे, दौलत दरोडा,आदिती तटकरे अतुल बेनके, रामराजे निंबाळकर पोहोचले आहेत. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या बैठकीला नसल्याचे समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद अजित पवारांना बहाल केले तर, 2024 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळू शकते, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. त्यानंतर यशाचे श्रेय सगळे अजित पवारांना जाईल. नकळतच ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे पदावर अजित पवार यांचा डोळा असल्याचे बोलले जात आहे.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच-येत्या काळामध्ये राज्यातील विधानसभा लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. त्या अनुषंगाने तिकीट वाटप वाटपाबाबतचा निर्णय हा सर्वस्वी प्रदेशाध्यक्षांच्या हाती असतो. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद खूप महत्त्वाचे आहे. ते पद मिळवण्यासाठी पक्षात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील प्रदेशाध्यक्षपद मिळावी, अशी जाहीर अपेक्षा व्यक्त केली आहे. जयंत पाटील हे सध्या प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान आहेत. अजित पवार आणि त्यांच्यात सध्या सख्य नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तिकीट वाटप संदर्भातील अधिकार आपल्याकडे यासाठी अजित पवार यांची धडपड सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर येथील आपला नियोजित दौरा रद्द केला आहे.