मुंबई : शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केली. 'मी तुमच्या भावनांचा अपमान करू शकत नाही. राजीनामा मागे घेण्याची तुमची मागणी मी मानत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मी मागे घेत आहे', असे ते यावेळी म्हणाले.
'अजित पवारांना राजीनाम्याची माहिती होती' :ज्यांनी राजीनामे दिले आहेत त्या सर्वांचे राजीनामे आम्ही फेटाळून लावल्याचे शरद पवार म्हणाले. पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांची माफी मागितली. तसेच अजित पवारांना माझ्या राजीनाम्याची माहिती होती, असे देखील ते म्हणाले. यामुळे ते माझ्या निर्णयाचे समर्थन करत होते, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला अजित पवार गैरहजर : आजच्या पत्रकार परिषदेला अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, प्रत्येकजण पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाही. काही लोक इथे आहेत आणि काही नाहीत. समितीने हा निर्णय घेतला आणि त्यांच्या निर्णयानंतर मी माझा निर्णय मागे घेतला. आज सकाळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमताने निर्णय घेऊन तो माझ्यापर्यंत पोहोचवला.