मुंबई: राष्ट्रवादीत अजित पवारांनी कथित बंड केल्यानंतर पक्षामध्ये उभी फूट निर्माण झाली आहे. या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचा झंझावती दौरा करणार आहेत. पवार हे रायगड ते शिवनेरी असा दौरा करणार असून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. शरद पवार हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यालयातील प्रफुल्ल पटेल यांचे फोटो काढण्यात आले आहेत. दुसरीकडे संख्याबळ वाढल्याने काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येणार आहे.
Live Update NCP Crisis :
राष्ट्रवादी फुटीनंतर परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार यांनी कायदेशीर तज्ज्ञांचे मत घेतले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
जे शरद पवार यांना नेता मानत नाहीत त्यांनी शरद पवार यांचा फोटो वापरू नये - राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे
परवानगीने फोटो वापरावा - राष्ट्रवादीसोबत अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचे यावर अजूनही स्पष्टता नाही. शरद पवार यांचा फोटो वापरण्याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. आता परवानगी घेऊनच शरद पवार यांचा फोटो वापरता येणार आहे.
ठाकरे गटाची बैठक संपली -आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी सर्व नेते आणि लोकप्रतिनिधींनी हात उंचावून महाविकास आघाडीमध्ये राहण्याचे मत व्यक्त केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया - सरकारमध्ये अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. केवळ काँग्रेसच नाही तर असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या पक्षांवर नाखूष आहेत, कारण त्यांचे नेते स्वार्थी आहेत. ते देशाच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करतात आणि त्यांना पंतप्रधान मोदी नको आहेत, अशी प्रतिक्रिया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
कार्यालयाचे उद्घाटन - राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नव्या कार्यालयाचे मुंबईत उद्घाटन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.दरम्यान, उद्घाटनाआधी या कार्यालयाची चावी हरवली होती. त्यामुळे थोडावेळ त्या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
बहुसंख्य राष्ट्रवादीचे आमदार माझ्यासोबत -आम्ही आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रिमंडळात एकत्र काम केले आहे. आम्हाला मंत्रिमंडळाचा अनुभव आहे. त्यापैकी बहुतांश मंत्री महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात होते. भाजपमध्येही काही मंत्री आहेत, जसे राधाकृष्ण विखे पाटील, ते काँग्रेसमध्ये असताना मी त्यांच्यासोबत काम केले. त्यामुळे त्यात काही नवीन नाही. सर्व कामे व्यवस्थित सुरू आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका, बहुसंख्य राष्ट्रवादीचे आमदार माझ्यासोबत आहेत, अशी प्रतिक्रिया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवारांना बोलावली बैठक - नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्व खासदार, आमदार, एमएलसी, जिल्हाप्रमुख आणि राज्य प्रतिनिधींना 5 जुलै रोजी एमईटी वांद्रे येथे बैठकीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्याचवेळी शरद पवार यांनी सर्व सदस्यांना त्याच दिवशी (५ जुलै) वाय.बी.चव्हाण सभागृहात बैठकीसाठी बोलावले आहे.
पुणे राष्ट्रवादीचा शरद पवारांना पाठिंबा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यकारिणीने आज बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर केला. तसेच पक्ष फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचा निषेध केला. हा ठराव राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी मांडला होता, त्याला उपस्थित सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला. या बैठकीला राष्ट्रवादीचे शहरप्रमुख प्रशांत जगताप यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यालय उद्घाटनापूर्वी राडामहाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शिवसेना भाजपा राष्ट्रवादी पक्षाचे सरकार राज्याने पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या विधिमंडळ कार्यालयाचं उद्घाटन आज मुंबईत पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी कार्यालय परिसरामध्ये वेगळाच ड्रामा घडल्याचे समजते.
उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी पक्षाचे नेते मातोश्रीवर पोहोचू लागले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडी, महाविकास आघाडीचे भवितव्य आणि तिन्ही मित्रपक्ष निवडणुकीला कसे जातील यावर बैठकीत चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीचे भवितव्य, अजित पवारांच्या बंडांनतर होणारे परिणाम, याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
आता एक भाकरीऐवजी अर्धी भाकरी खाणार-शिवसेनेत बाहेर पडल्यानंतर शिंदे गटाकडून राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्याने बंड केल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे नेते सत्तेत सहभागी झाल्याने त्यांची द्विधा स्थिती दिसत आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले म्हणाले, की राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्याने नाराज होऊ काय करणार आहोत. आता एक भाकरीऐवजी अर्धी भाकरी खाणार आहोत. आता वस्तुस्थिती स्वीकारण्याची गरज आहे. पुढील मंत्रीमंडळ विस्तारात माझा नंबर लागणार आहे, असा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे.
अजित पवार गटात सामील झाल्याने नागपूर जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर यांची उचलबांगडी-अजित पवार यांच्या बंडानंतर नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीपूर्वीच कार्यालयाबाहेर आम्ही सदैव साहेबांसोबत असा फलक लावण्यात आला आहे. अजित पवार गटात सामील झाल्याने नागपूर जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर यांची उचल बांगडी करून राजू राऊत यांना जिल्हाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. अशातच शहरातील व जिल्ह्यातील पदाधिकारी ते कोणाच्या बाजूने आहेत हे आजच्या बैठकीत स्पष्ट होऊ शकतो.
पक्ष व चिन्हावर दावा करा, अजित पवारांना दिल्लीतून आदेश-संजय राऊत-भाजप हा राजकारणातील किलर आणि सिरीयल रेपिस्ट आहे. पवार व ठाकरेंचे नाव पुसण्याचा प्रयत्न आहे. भाजपची गुन्हेगारासारखी काम करण्याची पद्धत आहे. भाजपने शिंदे गटाला पक्ष आणि चिन्हावर दावा करायला लावला आला. आता ही राष्ट्रवादीबाबत तसा प्रयत्न होत आहे. शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्याने भाजपमध्ये वैचारिक सुंता आहे. भाजपने सर्वाधिक भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा दिली आहे. फूट पाडल्यामुळे भाजपचे वस्त्रहरण झाले आहे. शिवसेनचाच निकाल राष्ट्रवादीचा लागू शकतो. कितीही लोक फोडो मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. पंचांग घेऊन तारखांचे भाकित कशाला? निवडणुका घ्या, असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे. शिंदे गट भाजपचा गुलाम आहे. गुलामांच्या नाराजी किंमत नाही.पक्ष व चिन्हावर दावा करा, असे अजित पवारांना दिल्लीतून आदेश आले आहेत. तसे करायला अजित पवारांना अक्कल नाही का? पक्षांमध्ये फोडाफोडी करणे हा रेपिस्टचा धंदा आहे, असे राऊत म्हणाले आहेत.
प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार परिपक्व राजकारणी तरीही?राष्ट्रवादीचे नेते व प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी अजित पवारांच्या बंडखोरीवर टीका केली आहे. क्लाईट म्हणाले, की प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे परिपक्व राजकारणी आहेत. त्यांना नियम आणि कायदे चांगले माहित आहेत. तरीदेखील त्यांनी असा प्रकार केल्याने काय म्हणणार? संविधानानुसार पक्षांतरविरोधी कायद्यानुसार, आमच्या पक्षाच्या घटनेनुसार, ते नवीन पक्ष कार्यालय काढू शकत नाहीत. आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल काही लोकांची नियुक्ती केली.
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारची आज पहिलीच मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत माजी विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मंत्रिमंडळात बैठक घेतानाचे चित्र पाहायला मिळणार आहे.
मुंबईत राजकीय पक्षांच्या बैठकींचे आज सत्र -राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 9 आमदारांवरील कारवाईचे पत्र दिल्यानंतर अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. अजित पवार यांनी ५ जुलैला बैठक बोलाविली आहे. त्यापूर्वी आज अजित पवार आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदाबाबत दावा केला आहे. काँग्रेसच्या आमदाराची तातडीची आज बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व इतर आमदार उपस्थित राहणार आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक शिवसेना भवनात दुपारी 12.30 वाजता पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलणार आहेत.
अनेक राजकीय पक्षांना एनडीएमध्ये सामील होण्याची इच्छा-केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, देशाच्या विकासासाठी अनेक राजकीय पक्षांना एनडीएमध्ये सामील होण्याची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी पुढाकार घेतला आहे. मला विश्वास आहे की राष्ट्रवादीचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा समावेश झाल्यास राज्याच्या विकासाला मदत होणाक आगे. 2024 ची लोकसभा राखून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एनडीएमध्ये सामील होणारे हे राजकीय पक्ष देशाच्या विकासासाठी केंद्रात मजबूत आणि स्थिर सरकार देणार असल्याचेही केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी म्हटले आहे.
नांदेड राष्ट्रवादीचा शरद पवारांना पाठिंबा-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी काही जणांनी गद्दारी केली. त्यांच्या गद्दारीला जनता येणार्या काळात उत्तर देणार आहे. अनुभवी दुरदृष्टी नेता, फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे पुरोगामी नेते शरद पवार यांच्यासोबत नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आम्ही गद्दारांच्या पाठीमागे जाणार नाही, असे मत नांदेड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष डॉ.सुनील कदम यांनी व्यक्त केले.
पुण्यात राष्ट्रवादीची बैठक-पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आहे. पुणे शहरात जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी बोलाविली आहे. आजच्या बैठकीत अजित पवारांना पाठिंबा द्यायचा की शरद पवारांना पाठिंबा द्यायचा याबाबत निर्णय होणार आहे. बैठकीला पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
- शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. दुपारनंतर सिल्व्हर ओक येथे शरद पवारांची भेट घेऊन राजीनामा आहेत. खासदारकीचा राजीनामा देऊन शरद पवारांच्या सोबत पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाप हा बाप असतो. बुद्धीपेक्षा कधी कधी ह्रदयाने विचार करावा लागतो असे सांगत त्यांनी साहेबांंसोबत म्हणजे शरद पवारांसोबत असल्याचे सांगितले.
- अजित पवार गटाचे ही मुंबईत राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेस कार्यालय असणार आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्या हस्ते आज दुपारी 12 वाजता उद्घाटन होणार आहे. मंत्रालयासमोरील शासकीय प्रतापगड बंगल्यातून कारभार चालविणार आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल ( कार्यकारी अध्यक्ष - राष्ट्रवादी कांग्रेस ) खासदार सुनिल तटकरे साहेब ( प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य ) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे
जयंत पाटील हे केवळ तात्पुरते प्रदेशाध्यक्ष -जयंत पाटील यांनी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची शिफारस विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. त्यांनी अजित पवार गटांतील नेत्यांना पदावरून हटविण्याचे आदेश देण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील यांना कारवाईचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. जयंत पाटील हे केवळ तात्पुरते प्रदेशाध्यक्ष होते, असा दावा केला आहे.
कुरघोडीच्या राजकारणाने महाविकास आघाडीवर परिणाम?- नियुक्त्यांचे आदेश केवळ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आहेत. त्यामुळे पटेल यांनी नियुक्त्यांचे दिलेले आदेश बेकायदेशीर असल्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. दुसरीकडे अजित पवार गटाने अनिल पाटील यांची प्रतोद मह्णून नियुक्ती केली आहे. अशातच महाविकास आघाडीतील व्रजमुठीला तडे गेले आहेत. विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेस आग्रही असून त्याबाबत आज काँग्रेसची बैठक होणार आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर ठाकरे गटही याबाबत आज बैठकीत चर्चा करणार आहे.
अजित पवारांकडून शरद पवारांना धक्का-विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शिंदे फडणीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खजिनदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची हकालपट्टी करून नव्या नियुक्त्या जाहीर करत शरद पवारांना धक्का दिला आहे.
हेही वाचा-
- Maharashtra Political Crisis : 'जो जसे करतो त्याला तसे फळ मिळते', महाराष्ट्राच्या राजकीय संकटावर भगतसिंह कोश्यारींची चुटकी
- 'जो जसे करतो त्याला तसे फळ मिळते', महाराष्ट्राच्या राजकीय संकटावर भगतसिंह कोश्यारींची चुटकी
- Maharashtra Political Crisis: असं घडतंय हे मी जाहीरपणे..; राष्ट्रवादीतील बंडाळीबाबत पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले, पाहा व्हिडिओ