मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खासदार, नेते संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत चांगलीच गाजत आहे. या मुलाखतीवरून भाजप, शिंदे गट तसेच मनसेकडून टीका केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणालेत बावनकुळे?आपल्या ट्विटमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत अडीच दिवसही उद्धव ठाकरे यांना मंत्रालयात जावेसे वाटले नाही. ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षांत काय केले, असा प्रश्न विचारत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालविले. कदाचित उद्धव ठाकरे यांना अल्झायमरचा आजार झाला आहे. याचे कारण म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तृत्वावर उद्धव ठाकरे यांनी शेकडो भाषणे करत जिंकून आले. तुम्ही चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. त्यामुळे मोदी यांच्यावर तुम्ही केलेली भाषणे तुम्हाला आठवतील, असा सल्लाही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी ५ दावेदार बाशिंग बांधून-बावनकुळे पुढे म्हणाले की, आमच्या महायुतीच्या जागा वाटपाची चिंता तुम्ही अजिबात करू नका, त्या ऐवजी तुमची शिल्लक सेना निवडणुकीपर्यंत तरी तुमच्यासोबत राहील का? त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आमची महायुती आत्मनिर्भर भारतासाठी झाली आहे. तर तुमची महाविकास आघाडी ही केवळ सत्ता आणि पैसा कमावण्यासाठी झाली आहे. तुमच्या महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी ५ दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात तुम्ही सुद्धा बोहल्यावर बसण्यासाठी फार उत्सुक आहात. परंतु २०२४ सालच्या निवडणुकी नंतर जनता तुम्हाला घरी बसवणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीचे घरी बसण्याचे काम भेटणार असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.