मुंबई : राज्यात शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर आता नव्या राजकीय समीकरणांची पडताळणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच शरद पवारांनी राजीनामा देऊन या चर्चांमधील हवाच काढून टाकली. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतही धुसपूस सुरू झाली असून आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढवणार की नाही, याबाबत साशंकता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत राज्यातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणातील निकाल येत्या काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निकालानंतर राज्यातील राजकीय गणितच पूर्णपणे बदलून जातील असे जाणकारांचे मत आहे.
निकाल सत्ताधारी गटाच्या विरोधात गेल्यास काय? : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षात जर शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अपात्र ठरून सरकार आपोआपच कोसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला नव्याने समीकरणे जुळवावी लागतील. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन भाजपने आपला प्लान बी तयार ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शरद पवार यांनी अजूनही आपल्याकडेच लोकमत आहे आणि अशा स्थितीत जर अजित पवार बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले तर त्यांच्यासोबत फारसे लोक जाणार नाहीत, हे आपल्या राजीनामा नाट्यातून सिद्ध केल्याची प्रतिक्रिया राजकीय तज्ञ प्रसाद देशपांडे यांनी दिली केली.