मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्याच्या भेटीची मोठी चर्चा होत आहे. या बैठकीसंदर्भात दोन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर आपआपली बाजू मांडत ती गुप्त बैठक नसल्याचे म्हटले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
बैठका सुरू : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे माप अजित पवार यांच्या बाजून झुकले तर महाविकास आघाडीमध्ये तडा जाण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर फक्त राज्यातच नाहीतर देशातील विरोधकांच्या इंडिया या आघाडीतही बिघाडी होण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या मुख्य पक्षांनी मिळून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीने सर्व निवडणुका एकत्र लढवण्याचा निश्चचय केला होता. जागा वाटपाविषयीही सर्वपक्षीय चर्चा केली जाईल. असे सांगितले जात होते. परंतु अजित पवार आणि शरद यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचा राष्ट्रवादीवरील विश्वास कमी झालेला दिसत आहे. याचमुळे शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेनेने आज लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून बैठका केल्या आहेत. या बैठकांचा 16 ते 19 तारखे दरम्यान पहिला टप्पा असणार आहे. त्यात काँग्रेसकडून कोअर समितीची बैठक आज होत आहे. यात आगामी I.N.D.I.A बैठकीच्या तयारीचा आढावा घेण्याबरोबरच काँग्रेस संघटना मजबूत करण्याची चर्चा होईल. तसेच शरद पवार यांच्याविषयीही चर्चा केली जाणार आहे.
संभ्रम नको :पुण्यातील चांदणी चौक येथील उड्डाणपूल उद्घघाटनाच्या दिवशी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची भेट पुण्यातील उद्योजकांच्या घरी झाली. यावर स्पष्टीकरण देताना नुकतेच शरद पवार म्हणाले की, अजित पवार हे माझे पुतणे आहेत. पवार कुटुंबात मी वडीलधारी व्यक्ती आहे. त्यामुळे मला कोणी भेटायला आले किंवा कोणाला भेटायला बोलवले तर चर्चा होऊ नये. तसेच आपण भाजप सोबत जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे स्पष्टीकरण दिल्यानंतर कोणीच संभ्रम निर्माण करू नये असेही ते म्हणाले होते.