मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या बंडखोरीनंतर आता अजित पवार यांनी पक्षावर आपला दावा सांगितला आहे. त्यांनी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. मात्र यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. आता राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे आधी तपासणार आणि त्यानंतरच अन्य बाबींवर निर्णय देता येईल अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
अजित पवारांना किती आमदारांचा पाठिंबा? : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षातील काही आमदारांसह सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी 25 ते 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपाल यांच्याकडे सुपूर्द केल्याची चर्चा आहे. मात्र नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. तसेच सह्या केलेल्या आमदारांची नावे देखील अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या जागी सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले. यामुळे पुन्हा एकदा सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे.
'दाव्या प्रतीदाव्यांमध्येच वेळ काढणे भाजपचा डाव' :याबाबत प्रतिक्रिया देताना राजकीय विश्लेषक विवेक भावसार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत ज्या पद्धतीने खेळी खेळली त्याच पद्धतीने राष्ट्रवादीसोबत खेळण्यात येत आहे. आता नेमका खरा पक्ष कोणाचा याबाबत सर्वोच्च न्यायालय, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग यांच्याकडे याचिका दाखल केल्या जातील. दावे-प्रतीदावे सादर होतील आणि त्यानंतर त्यावर निर्णय दिला जाईल. मात्र या सर्व प्रक्रियेला वेळ लागू शकतो. दरम्यानच्या काळात पुढील निवडणुका सुद्धा होऊन जातील. वास्तविक यासंदर्भात कुठलाही निर्णय तातडीने दिला जाणार नाही. त्यामुळे जरी कुणी पक्षावर दावा सांगितला असला तरी त्याबाबत पडताळणी करण्यातच वेळ जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी केवळ दाव्या प्रतीदाव्यांमध्येच वेळ काढणे आणि दरम्यानच्या काळात सरकार चालवणे हा भाजपचा डाव असल्याचे भावसार यांनी सांगितले.