सभेत बोलताना सुप्रिया सुळे मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष अस्तित्वासाठी लढतो आहे. एकाच वेळी 40 आमदारांनी साथ सोडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष बांधणीसाठी कंबर कसली आहे. खासदार सुप्रिया सुळे या देखील कमरेला पदर खोचून बापाच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या राहिले आहेत. आज आठ ते नऊ खुर्च्या रिकाम्या झाल्या आहेत. नव्या लोकांना येथे संधी उपलब्ध होईल. मात्र, अडचणीच्या वेळी उभ्या राहणाऱ्या महिला वर्गाला 33 टक्के आरक्षण मिळवून द्या, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. दरम्यान, केंद्रात भाजप सरकारला पळो की सळो करून सोडू, असा इशारा दिला.
अजित पवार गटाला सुप्रिया सुळे यांनी सुनावले: लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी या गाण्यातून सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. हा बाप माझा एकटीचा नाही तुम्हा सर्वांचा आहे. तुम्ही कोणावरही बोला मात्र आई आणि वडिलांचा नाद करायचा नाही, असे सांगत वडीलधाऱ्यांवर बोलणाऱ्यांना अजित पवार गटाला सुप्रिया सुळे यांनी खडे बोल सुनावले. काही बोललं तर महिला म्हणून डोळ्यात टचकन पाणी येईल. परंतु अडचण आणि संघर्षाची वेळ येते, तेव्हा तीच महिला अहिल्या, ताराराणी होते. महाराष्ट्राचा हा इतिहास आहे असे सांगत, सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना लढण्याचा विश्वास देत, अजित पवार गटावर टीकास्त्र सोडले.
एकाच वेळी 40 आमदारांनी साथ सोडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष बांधणीसाठी कंबर कसली आहे. नवीन उमेदीने आज पक्ष सुरू होणार आहे. तुम्ही स्व:ताहून या आगामी निवडणुकीसाठी महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या. आम्ही ५० टक्के मागत नाही आणि आमच्यासारखे काही ओपनमधून पण लढतील -खासदार सुप्रिया सुळे
अडचण येते तेव्हा लेक भक्कमपणे उभी राहते: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीला नॅचरल करप्ट पार्टी असे हिनवायचे. ना खाऊंगा ना खाने दूंगा असे मोदी म्हणायचे. आता खाणारेच पक्षात घेतले जात आहेत, असा चिमटा सुप्रिया सुळे यांनी काढला. नुकताच 70 हजार कोटींचा घोटाळा मोदी यांनी भोपाळ येथील सभेत केला होता. काहींनी आमच्यावर आईस ( इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआय) कारवाई होईल, असे सांगण्यात आले. शरद पवार यांचे वय झाले त्यांनी आशीर्वाद द्यावेत अशी टीका केली गेली. पक्ष देखील फोडला. मात्र वडिलांवर अडचण येते तेव्हा लेक, बहीण भक्कमपणे उभी राहते, असे सांगितले.
अजित पवार गटाला टोला : 2019 ची निवडणूक आम्ही विसरलेलो नाही. राष्ट्रवादीला 11 जागा होत्या. तरीही शरद पवार लढले. आज जे गेलेत त्यांना त्यांचे नशीब लख लाभ होवो, असे सुळे म्हणाल्या. भाजपने देशात द्वेष पसरवला आहे. त्यामुळे भाजप विरोधात लढायचा असेल तर पूर्ण ताकतीने उतरायला हवं, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच दिल्लीत सोबत असलेल्या खासदारांना घेऊन केंद्र सरकारचा जाहीर कार्यक्रम करू असा इशारा दिला. सत्ता येते सत्ता जाते. सत्तेतून सुख मिळत नाही, असा अजित पवार गटाला टोला लगावला.
नव्या लोकांना संधी मिळेल : ज्यांना पक्षाने निवडून दिले त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आता संघर्ष करायची वेळ आली आहे. नऊ खुर्च्या रिकाम्या झाल्यात तेथे नव्या लोकांना संधी मिळेल. परंतु महिलांना ते 30 टक्के आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी करताना नव्या उमेदीने कामाला लागू या, जिद्दीने लढूया असे आवाहन केले. कोणी कितीही घाई करू पक्ष चिन्ह आमच्याकडेच राहील. कारण आमच्या एकच शिक्का आहे, तो म्हणजे शरद पवार त्यामुळे आम्ही कोणत्याही लढाईला घाबरत नाही, असा इशारा सुळे यांनी दिला.
हेही वाचा -
- Sharad Pawar NCP Meeting : चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना विश्वास
- NCP Delhi Meeting : शरद पवारांची ताकद दिल्लीत दिसणार का? गुरुवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
- NCP Crisis : अजित पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष; एकमताने ठराव मंजूर, पत्र निवडणूक आयोगाला पाठवले