ठाणे : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे. यामध्ये विधानसभेचे त्यावेळचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या वकिलाने न्यायालयात बाजू मांडली होती. त्यांनी न्यायालयात सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करून न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असल्याचे म्हटले होते अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. ते आज ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. या पत्रकार परिषदेत ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघेसह बहुतांश कॉंग्रेसचे स्थानिक नेते उपस्थित होते.
नाना पटोले यांची मोदी सरकारवर टीका :केंद्रात ५६ इंच छातीचे सरकार असूनही दररोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. ते उद्ध्वस्त होत असतानाच आज काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. मात्र भाजप सरकार काश्मीर फाइल, द केरळ स्टोरी सारखे चित्रपट दाखवून लोकांमध्ये जातीवाद निर्माण करत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. असा एखादा चित्रपटच केंद्र सरकारच्या नावाने काढाय हवा असा टोला कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारला लगावला. पटोले हे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष चोरघे यांच्या भिवंडीतील निवासस्थानी आले होते. त्यावेळी पत्राकर परिषदेत त्यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.