मुंबई : शिवसेनेत बंडखोरी केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा उद्या निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात धाकधूक वाढली आहेत. निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी कोणत्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे हे जाणून घेऊया...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे :एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी - पाचपाखडी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. 2004 पासून सलग चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रभावाने 1980 च्या दशकात ते राजकारणात आले. सार्वजनिक बांधकाम, नगरविकास मंत्री आणि सध्या राज्याचे 20 वे मुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेतील 40 आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरकार उलथवून लावत, भाजपच्या पाठिंब्यावर स्वतः मुख्यमंत्री झाले. सध्या शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत.
अब्दुल सत्तार :सिल्लोड विधानसभा मतदार संघाचे अब्दुल सत्तार विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार मध्ये कृषी मंत्री कार्यरत आहेत. सत्तार यांच्या राजकीय कारकिर्दीला १९८४ ला सुरुवात झाली. यापूर्वी कॉंग्रेसमध्ये ते मंत्री राहिलेले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्तार राज्यमंत्री होते. एकनाथ शिंदेंच्या बंडात भाग घेतल्यानंतर त्यांच्यावर कृषीमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. सिल्लोडचे नगराध्यक्षपदापासून सलग तीन वेळा आमदा म्हणून निवडून आले आहेत. राज्यात शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून त्यांची कारकिर्द वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.
संदीपान भुमरे :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याचे मंत्री संदीपान भुमरे आमदार आहेत. सलग पाच वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. 1988 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कट्टर शिवसैनिक असलेल्या भुमरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीत सामील झाल्याने टीकेचा सामना करावा लागला होता. सध्या रोहयो आणि फलसंवर्धन मंत्री म्हणून कार्यरत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर भुमरेंवर जोरदार टीका झाली. दरम्यान, चांगले व्हिडीओ पोस्ट व्हायरल कर, असे कार्यकर्त्याला त्यांनी केलेले आवाहन चांगलेच व्हायरल झाले होते. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात 'स्लिप बॉय' पासून कामाला सुरुवात केली. पुढे आता त्याच कारखान्याचे चेअरमन आहेत.
संजय शिरसाट :शिवसेनेचे शहरसंघटक म्हणून संजय शिरसाट यांचा 1985 मध्ये राजकीय प्रवास सुरु झाला. त्यापूर्वी रिक्षाचा व्यवसाय सांभाळत होते. राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर 1995 आणि 99 मध्ये मराठवाडा औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी संजय शिरसाट यांची निवड झाली. औरंगाबाद येथे 2000 च्या महापालिका निवडणुकीत कोकणवाडी वॉर्डातून ते पहिल्यांदा निवडून आले. 2001 मध्ये सभागृहनेते पदाची त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. 2003 मध्ये स्थायी समिती, 2005 मध्ये पुन्हा नगरसेवक झाले. महापालिकेच्या राजकारणासोबतच पश्चिम मतदारसंघ आणि शहराजवळील भागाशी संपर्क वाढवत विधानसभेची तयारी केली. 2009, 2014 व 2019 अशा सलग तीन विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्ता आल्यापासून शिरसाट यांना मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. परंतु, पक्षातून अद्याप मंत्रिपदी वर्णी न लावल्याने ते प्रचंड नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपावून शांत केल्याचे बोलले जाते.
तानाजी सावंत :उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा वाशी मतदार संघाचे तानाजी सावंत विद्यमान आमदार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव गावात त्यांचा जन्म 1 जून 1964 साली जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर पी.एच.डी पूर्ण करुन प्राध्यापक म्हणून त्यांनी काही वर्षं काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 2015 मध्ये शिवसेनेचा भगवा हाती घेतला. अल्पावधीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मर्जी संपादन केली. त्यानंतर संघटनेत संपर्कप्रमुख, उपनेते, युती सरकारमध्ये मंत्री अशी पदे भूषविली. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेंना सोडचिट्टी देत, शिंदेना पाठिंबा दिला. सध्या आरोग्य मंत्री असून सावंत यांची अनेक विधाने वादग्रस्त ठरली आहेत.
यामिनी जाधव :शिवसैनिक ते आमदार असा यामिनी जाधव यांचा राजकीय प्रवास आहे. यामिनी जाधव उच्चशिक्षित असून 2012 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. ठाकरेंचे विश्वासू आणि कट्टर शिवसैनिक असलेल्या यामिनी जाधव यांच्यावर विविध समित्यांची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती. पुढे 2019 च्या भायखळा विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून आमदारकीची तिकीट मिळाली आणि त्या पहिल्याच टर्ममध्ये आमदार झाल्या. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी 15 कोटींचा आरोप केल्यानंतर ईडीकडून छापे मारण्यात आले. जाधव कुटुंबियांनी त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिल्याचे बोलले जाते.
चिमणराव पाटील :जळगाव जिल्ह्यातील पारोळा-एरंडोल मतदार संघाचे चिमणराव पाटील विद्यामान आमदार आहेत. शिवसेनेची जळगाव जिल्ह्यात ताकद वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. शिवसेनेचे आमदार म्हणून ते तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले आहेत. जनता पार्टीपासून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1978 मध्ये त्यांनी पहिल्यांदा जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात जेडीसीसीच्या माध्यतातून राजकारणाचा श्रीगणेशा केला. मार्केट कमिटी, भू विकास बँक, राहूरी कृषी विद्यापीठ आदींमधून त्यांची राजकीय ठसा उमटवला. ज्येष्ठ आमदार असताना वारंवार त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला. शिंदेंसोबत सुरतला गेलेले ते पहिले आमदार होते.