मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी सर्व आमदारांना व्हीप जारी करून बुधवारी महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यास बजावले आहे. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटानेही स्वतंत्र बैठक बोलावली आहे. अजित पवार यांच्या बंडखोर आमदारांची मुंबईत बैठक पार पडणार आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार यांचे विश्वास सहकारी श्रीनिवास पाटील, राजेंद्र शिंगणे, प्राजक्त तणपुरे हे देखील वाय बी सेंटरला पोहोचले आहेत. तर आमदार रोहीत पवार यांनी यावेळी ईव्हीएम मशीनवरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. वाय बी सेंट्रला सध्या अकरा आमदार पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार वाय बी सेंटरला पोहोचले आहेत.
शरद पवारांचा फोटो का वापरला, जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप :शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाने आपला फोटो वापरु नये, अशी तंबी दिली आहे. मात्र त्यानंतरही अजित पवार गटाच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आला आहे. मात्र हा फोटो वापरण्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल करण्यात आला. शरद पवार हे त्यांची प्रॉपर्टी आहे का असेही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट आदी भागातून सुमारे ९१ बसगाड्यांमधून हजारो कार्यकर्ते रवाना झाले आहेत.
रोहीत पवारांचा ईव्हीएमवर हल्लाबोल :भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच भाजपने अगोदर शिवसेना फोडील आहे. त्यानंतर आता पुन्हा भाजपने राष्ट्रवादी फोडली आहे. कर्नाटकमध्ये भाजप हरली आहे. तसेच हरियाणाआणि पंजाबमध्ये होणार असल्याचे दिसून येणार आहे. मात्र महाराष्ट्रातील काही अधिकाऱ्यांनी सध्या ईव्हीएम दुरुस्ती करण्यासाठी सूचना दिल्याचा दावा रोहीत पवार यांनी केला. त्यामुळे आगामी डिसेंबर महिन्यात निवडणूक लागण्याची शक्यता रोहीत पवार यांनी वर्तवली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी जारी केला व्हीप :शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची आज वाय बी सेंटर येथील कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिप जारी करत आमदारांना उपस्थित राहण्याबाबतची तंबी दिली आहे. शरद पवार यांनी 5 जुलै रोजी वाय बी चव्हाण सेंटर येथे दुपारी 1 वाजता बैठक बोलावली असून, सर्व आमदारांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे या व्हिपमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.