मुंबई :महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या नाट्यमय बदलानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार सत्तेमध्ये सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी पसरल्याच्या चर्चा आहेत. इतकेच नाही तर शिंदे गटाचे काही आमदार उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याचे देखील बोलले जात आहे. या सर्व राजकीय परिस्थितीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गरज संपली आता, तुम्ही गाशा गुंडाळा, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
हा औटघटकेचा खेळ आहे :एकनाथ शिंदे यांच्या गटात काय चालले हे पहायला मी बसलो नाही. राज्यातील राजकीय घडामोडीवर उद्धव ठाकरेंनी नांदा सौख्यभरे या एका ओळीत प्रतिक्रिया दिली होती. हीच भूमिका त्यांच्यासाठी योग्य असून हे अपेक्षित होते. हा आऊटघटकेचा खेळ आहे. बहुमत 170 चे असताना देखील नव्याने राष्ट्रवादीच्या आमदारांचा चाळीसचा एक गट आणला जातो. याचा अर्थ तुमची गरज संपली, आता तुम्ही ताशा गुंडाळा असा होत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार बसले बाशिंग बांधून :राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची शपथ होते, पण या गटाच्या बाशिंग बांधून बसलेल्या आमदारांना शपथ दिली जात नाही. महाराष्ट्राला पुन्हा एकदा नवीन मुख्यमंत्री मिळेल, असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी केला. ना घर का ना घाट का अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. ही परिस्थिती त्यांनी स्वतःहून ओढून घेतलेली आहे. स्वाभिमान असेल आणि जुनी वक्तव्ये आठवत असतील तर द्या राजीनामे. तुमच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. स्वाभिमान अभिमान त्यांच्या भांडणांमध्ये आम्हाला पडायचे नाही. मात्र ते आपापसात झुंजून संपून जातील असेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.