मुंबई :महाराष्ट्रात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी रात्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आपले गुरू आहेत. त्यांचा आम्ही नेहमीच आदर करतो. मात्र पक्षातील ध्येय धोरणांमुळे आम्ही सरकारमध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या आमच्यासोबत 40 पेक्षा जास्त राष्ट्रवादीचे आमदार असल्याचा दावाही प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
शरद पवार हे आमचे गुरू असल्याने आदर :शरद पवार हे आमचे गुरू असल्यामुळे त्यांचा आम्हाला नेहमीच आदर असल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. आम्ही त्यांचा नेहमीच आद करू. त्यांचा फोटो आम्ही त्यांना असलेल्या आदरामुळेच वापरत आहोत. त्यांचा आम्ही कुठेही अनादर केला नसल्याचेही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले.
अजित पवारांसोबत 40 पेक्षा जास्त आमदार :अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राष्ट्रवादीत बंड केले आहे. त्यामुळे शरद पवार यांना चांगलाच हादरा बसला आहे. सगळे आमदार परत येतील असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र अजित पवार यांच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. त्याबद्दल कोणतेही दुमत नसल्याचेही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवीचे 51 आमदारांनी दिले होते पत्र :एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये 40 आमदारांना घेऊन सूरत आणि गुवाहाटी येथे गेले होते. तेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळेल याची खात्री होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 51 आमदारांनी शरद पवार यांना सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी पत्र दिले होते. यामध्ये कोणताही वैचारिक फरक नसून आपण शिवसेनेसोबत गेलो तर भाजपसोबतही नक्कीच जाऊ शकतो, असेही या आमदारांचे मत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले.