मुंबई -अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच कॅबिनेट बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची वेगळी बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तसेच अजित पवार यांच्या गटाचे नवीन कार्यालय मुंबईत सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनही अजित पवार यांनी केले आहे.
खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवारांशी भेट - राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा शरद पवार यांच्याकडे सोपवला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मी 5 जुलैला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीला हजर राहणार आहे. कार्यकर्ते तुमच्यासोबत असल्याची जाणीव मी शरद पवार यांना करुन दिली असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.
दोन्ही पवार गटांच्या 5 जुलैला बैठका - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गटाची 5 जुलै रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. तसेच शरद पवार यांनीही 5 जुलै रोजीच आपल्या गटाची मुंबईत बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता किती आमदार व खासदार कोणत्या गटाकडे जाणार हे 5 जुले रौजीच स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच एकाच दिवशी दोन्ही नेत्यांनी बैठक बोलावल्याने नेत्यांची नेमकी विभागणी स्पष्टपणे कळणार आहे.
मंत्रिमंडळाची बैठक - अजित पवार आपल्या साथीदारांसोबत मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली आहे. याबैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्व मंत्री यावेळी हजर होते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबाबत खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकमेकांचे कट्टर विरोधक बैठकीत एकत्र - राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी हल्लाबोल केला होता. मात्र, आज पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नेत्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसण्याची वेळ या मंत्र्यांवर आली. तोच प्रकार राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बाबतीत झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्र्यांवर विविध आरोप केले होते. मात्र आज त्यांच्यासोबत बैठकीला हे नेते एकत्र बसले होते.
नवीन कार्यालय सुरू, चावी हरवली - बंडखोरीनंतर अजित पवारांनी आम्हीच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी आपल्या गटाचे नवीन कार्यालय मुंबईत आज सुरू केले. मात्र, या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाला अजित पवार हे पोहोचल्यानंतर या कार्यालयाची चावी गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे अजित पवार यांना एक तास ताटकळावे लागले होते. अजित पवार यांनी उद्घाटन केलेले हे नवीन कार्यालय मंत्रालयाच्या शेजारीच आहे. यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचे सांगितले आहे.
अनिल पाटील म्हणाले आम्हीच व्हिप बजावणार - राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी येणाऱ्या काळात पक्षातील आमदारांना व्हिप बजावण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच आमच्याकडे जास्त संख्याबळ असल्याने आम्हीच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावाही त्यांनी केला. अनिल पाटील म्हणाले की, मला प्रतोद असण्याचा अनुभव आहे. पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष आणि गट नेत्यांच्या आदेशाने व्हिप बजावला जाईल. येणाऱ्या काळात तेच व्हिप लागू होणार आहे. सर्वच आमदार अजित पवारांचे नेतृत्व मान्य करत आहेत. व्हिप कोणी मोडेल असे मला वाटत नाही. आम्हीच राष्ट्रवादी आहोत त्यामुळे बंडखोरी म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही, असे अनिल पाटील यावेळी म्हणाले.