मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पक्षविरोधी कारवायांसाठी खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. शरद पवार यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. शरद पवार म्हणाले की, 'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने पक्षविरोधी कारवायांसाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश देत आहे'.
'बंडखोरांना पाच तारखेपर्यंत वेळ' : राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात बैठक झाली. या बैठकीत बंडखोरांना पाच तारखेपर्यंत वेळ दिला जाईल आणि त्यानंतरच पुढील कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचं ठरलं आहे. शरद पवार यांना मिळणारा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांनी आपल्या मतदारसंघात येऊन आपल्या विरुद्ध सभा घेतली तर आपलं काय होईल अशी भीती आमदारांना आहे, असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
'शरद पवार राज्यभर दौरा करतील' : जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'आमदार कुठेही गेले तरी ते सर्व परिस्थिती बघत आहेत. ते सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह आहे. आजची परिस्थिती पाहता सोशल मीडियावर त्यांना कशाप्रकारे ट्रोल केलं जात आहे आणि शरद पवार यांना कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे हे त्यांना कळतंच असेल. शरद पवार येणाऱ्या काळा राज्यातील दौरा सुरू करतील. त्यामुळे आता सोडून जाणारे आमदार आपलं काय होईल याचा विचार करत आहेत'.