मुंबई - शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 6 जुलै रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान दिल्लीत ही बैठक आयोजित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीचे चित्र समोर आल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी, आमदारांशी चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे दौऱ्याचे नियोजन सुरू केले आहे.
दिल्लीत शक्तीप्रदर्शन -बुधवारी आमदार, खासदार, प्रदेश कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर गुरुवारी 6 जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. बुधवारी राज्यात झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांच्याकडे जवळपास 16 आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अजित पवार यांच्याकडे 30 ते 32 आमदार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता दिल्लीत शरद पवार यांचे शक्तीप्रदर्शन किती यशस्वी ठरणार हे गुरुवारीच स्पष्ट होणार आहे.
कायदेशीर लढाईचे संकेत : पक्षातील अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे. पक्षावरील पकड कायम ठेवण्यासाठी पवारांकडून पावले उचलली जात आहेत. दिल्लीत होणाऱ्या याच कार्यकारिणीत पक्षाची रचना आणि संघटनेतील बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असा अंदाज आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत कोणाला बहुमत मिळते यावरही कायदेशीर लढाईचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यात अजित पवार यांना किती पदाधिकारी साथ देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
वर्धापन दिनानिमित्त कार्याध्यक्षांची घोषणा : गेल्या महिन्यात राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि झारखंडची जबाबदारी देण्यात आली होती. सुनील तटकरे यांच्याकडे ओडिशा, पश्चिम बंगाल, कृषी आणि अल्पसंख्याकांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याशिवाय त्यांच्याकडे पक्षाच्या खजिनदारपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. तर जितेंद्र आवाड यांच्याकडे बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आणि कामगार खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या बैठकीत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा -Sharad Pawar On NCP Crisis : भाजपसोबत जो गेला 'तो' संपला; शरद पवारांचा हल्लाबोल